निवडणूक येताच 'त्यांची' घरोघरी मांदियाळी!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 February 2020

आगामी पालिका निवडणुकीचा जोर वाढत चालला असून, मतदारांना खुश करण्यासाठी विद्यमान नगरसेवकांसह नवख्या इच्छुक उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. या उमेदवारांची घरोघरी मांदियाळी वाढली असून, ते प्रत्यक्ष भेटून नागरिकांना समस्यांविषयी विचारपूस करत आहे.

नवी मुंबई : आगामी पालिका निवडणुकीचा जोर वाढत चालला असून, मतदारांना खुश करण्यासाठी विद्यमान नगरसेवकांसह नवख्या इच्छुक उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. या उमेदवारांची घरोघरी मांदियाळी वाढली असून, ते प्रत्यक्ष भेटून नागरिकांना समस्यांविषयी विचारपूस करत आहे. याशिवाय अनेकांकडून भूमिपूजन, उद्‌घाटन, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा यांसारखे कार्यक्रम आयोजित करत, नागरिकांशी जोडलेले असल्याचा आव आणला जात आहे.

ही बातमी वाचली का? शोएब अख्तरचे भारत-पाकिस्तानबद्दल मोठे विधान

एप्रिल महिन्यात महापालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी आपणच कसे जनतेचे सेवक आहोत, त्यांच्या समस्या कशा लवकरात लवकर सोडवतो, हे दाखवण्यासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये चुरस लागली आहे. यासाठी त्यांच्याकडून उघड्यावर पडलेला कचरा गाजावाजा करत उचलून नेला जात आहे. सुख-दु:खाच्या प्रसंगी एकाच व्यासपीठावर सर्वांची उपस्थिती दिसून येत आहे. झोपडपट्टी परिसर आणि ज्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, अशा भागात पाणीपुरवठा वेळेवर व्हावा, यासाठी प्रशासनाशी पत्रव्यवहार केला जात आहे. यामध्ये नगरसेवकही मागे नाहीत. गावठाण, झोपडपट्टी; तसेच नोडमध्ये ज्या काही समस्या असतील, त्याबाबत प्रशासनाशी पत्रव्यवहार करून कामे केली जात आहेत. तसेच पूर्वीची समस्या व आताची परिस्थिती अशा दोन्ही प्रकारची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित करत आपली भावी नगरसेवक असल्याची छबी दाखविण्यासाठी प्रत्येकाची स्पर्धाच लागली आहे. याशिवाय पालिका निवडणूक ही लग्नाच्या हंगामात लागण्याची शक्‍यता असल्याने, अनेकांनी अद्याप लग्न-सोहळ्याच्या तारखाही ठरवलेल्या नाहीत. निवडणूक कधी जाहीर होते, याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

ही बातमी वाचली का? कर्नाळा बॅंक घोटाळा; विवेक पाटलांसह 76 जणांवर गुन्हा दाखल 

सोहळ्यांना हजेरी 
शहरातील रस्ते, खुले विद्युत रोहित्र, गटारे यांसारखी विकासकामे केली जात आहेत. याशिवाय लग्न-समारंभ, साखरपुडा आणि धार्मिक सोहळ्यात इच्छुकांकडून आवर्जून हजेरी लावली जात आहे. कधी-कधी एकाच सोहळ्यात सर्वच पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित राहत आहेत; तर केलेली विकासकामे ही कोणामार्फत केली जात आहेत, हे नागरिकांना दाखवण्यासाठी जाहिरातबाजीचा आधार घेतला जात आहे. 

ही बातमी वाचली का? गिधाडांमुळे बागायतदारांवर संक्रांत

स्वच्छतेवर भर 
इच्छुक उमेदवार गल्लीबोळीत पडलेला कचरा उचलत आहेत. त्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांचीही मदत घेतली जात आहे; तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के प्राधान्य असल्यामुळे, इच्छुक महिला उमेदवारही मतदारांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत आहेत. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांतून आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strong front of aspirants for Navi Mumbai municipal elections