esakal | रस्ता खराब असल्यास चालकाला जीवितहानीसाठी जबाबदार धरू शकत नाही- न्यायालय
sakal

बोलून बातमी शोधा

The court

'रस्ता खराब असल्यास चालकाला जीवितहानीसाठी जबाबदार धरू शकत नाही'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : चालकाची चूक नसतानाही खराब रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रिक्षा चालकाला जीवितहानीसाठी दोषी धरता येणार नाही, असे मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने (magistrate court) म्हटले आहे. एका रिक्षाचालकामुळे ११ वर्षांपूर्वी एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सुनावणी घेताना न्यायालयाने निर्णय दिला आहे.

हेही वाचा: "पादचाऱ्यांनी ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे झेब्रा क्रॉसिंग असल्याशिवाय ओलांडू नये"

नसीन बगदादी या मुलगी स्नेहल देसाई आणि दानेश आणि साहील असे दोन नातू यांच्यासह ७ जून २०१० ला मीरा रोड येथील त्यांच्या मुलाच्या घरी जात होते. त्यावेळी रिक्षाचालक भरधाव वेगाने रिक्षा चालवित असल्याचा आरोप बगदादी यांनी केला होता. तसेच रिक्षा आरे कॉलनीजवळ पोहोचताच चालकाचे नियंत्रण सुटले आणि सिमेंटच्या खांबाला धडकला. त्यामुळे बगदादी यांच्या छाती आणि पोटाला दुखापत झाली. स्नेहलचा डावा पाय जखमी झाला होता. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सर्वांना रुग्णालयात दाखल केले. यावेळी बगदादी यांचा जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

सुरुवातीला बेजाबदारपणे वाहन चालविण्याच्या आरोपाखाली रिक्षाचालक सुरज जैस्वालला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर मृत्यूचा आरोप ठेवून त्याला अटक करण्यात आली. मात्र, जैस्वालने सर्व आरोप फेटाळून लावले आणि खराब रस्त्यांमुळे अपघात झाल्याचे सांगितले. मात्र, यावेळी प्रत्यक्षदर्शी स्नेहलने चालक बेजबाबदारपणे गाडी चालवित असून रिक्षा धडकली त्यावेळी एक रॉड तिच्या आईच्या रिब्समध्ये गेला.

''दोन्ही प्रत्यक्षदर्शींनी रस्ता खराब असल्याचे सांगितले. फिर्यादीनुसार चालक भरधाव वेगाने रिक्षा चालवित होता. मात्र, प्रत्यक्षदर्शी स्नेहल यांनी आपल्या जबाबामध्ये तसे काहीही नमूद केले नाही. त्यामुळे रिक्षाचालक हा बेजबाबदारपणे गाडी चालवित होता, की भरधाव वेगाने गाडी चालवित होता याबाबत साशंकता निर्माण होते'', असेही न्यायालयाने म्हटले आहे.

loading image
go to top