esakal | मन सुन्न करून टाकणाऱ्या क्रॉफर्ड मार्केट हिट अँड रन दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

मन सुन्न करून टाकणाऱ्या क्रॉफर्ड मार्केट हिट अँड रन दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सरोजा व झुबेदा दोघी फुटपाथवर एकमेकांशी बोलत उभ्या होत्या. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या कारने बाजूच्या चायनीज खाद्य विक्रेत्याचे सर्व सामान या महिलांच्या अंगावर कोसळले

मन सुन्न करून टाकणाऱ्या क्रॉफर्ड मार्केट हिट अँड रन दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई : मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरातील जनता हॉटेलसमोर भरधाव कारने सोमवारी रात्री नऊ जणांना जोरदार धडक दिल्याची गंभीर घटना घडली आहे. या अपघातात पाच जणांचा  मृत्यू झालाय.  तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी चालक आरोपीविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

जखमींवर जे.जे रुग्णलयात उपचार सुरू आहेत. भरधाव वेगात असलेल्या या गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सय्यद समीर अली ऊर्फ डिग्गी असं या 46 वर्षीय कार चालकाचे नाव असून त्यालाही दुखापत झाली आहे. समीर विरोधात 304 (2), 279, 337, 427, 308 भादविसह मोटार वाहन कायदा कलम 183 व 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम हारून मरेडियाया 33 वर्षीय व्यक्तीच्या तक्रारीवरून याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरेडिया हे तेथील एका हॉटेलचे व्यवस्थापक असून त्याच्या डोळ्यासमोर हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोठी बातमी : शरद पवार सहकुटुंबिय 'वर्षा'वर बाप्पाच्या दर्शनाला, सुप्रिया सुळेंकडून 'सीकेपी मूव्हमेंट' शेअर

क्राॅफर्ड मार्केट परिसरात कायमच खरेदीसाठी नागरिक गर्दी करत असतात. रात्री 9 च्या सुमारास या गर्दीच्या ठिकाणी एका कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले, त्यावेळी त्याच्या भरधाव कारने चार जणांना चिरडले, नईम, सरोज, जुबेडा आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातात चार  जण गंभीर जखमी झाले असून मोहम्मद जुही, नदीन अन्सारी, कमलेश, मोहम्मद नदीम अशी या चौघांची नावे आहेत. या सर्वांना तातडीने जवळील जे.जे.रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

आरोपी चालक सराईत गुन्हेगार, झालीये  तडीपारीचीही कारवाई 

आरोपी समीर उर्फ डिग्गी हा सराईत गुन्हेगार असून वयाच्या 23 व्या वर्षी प्रथम त्याला बनावट नोटांप्रकरणी अटक झाली होती. 1997 मध्ये जे.जे. मार्ग पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्यांत त्याचा भाऊ मेहराज अली ऊर्फ डॅनी व मेहूणा शेख सज्जाद हे दोघेही सह आरोपी होते. त्याप्रकरणी शिवडी सत्र न्यायालयाने समीरला पाच वर्षांची शिक्षा व दोन हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यानंतर त्याने शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथे त्याला जामीन झाला होता. 2007 मध्ये डिग्गीने सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणीही जे.जे.मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. 2008 मध्ये त्याच्यावर तडीपारीचीही कारवाई करण्यात आली होती.एकट्या 2013 वर्षात आरोपीविरोधात मारहाणीचे सह अदखलपात्र गुन्हे जे.जे. मार्ग पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. एमआरए मार्ग पोलिस ठाण्यातही आरोपीविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणीही समीरविरोधात जे.जे. मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याशिवाय हत्यार बंदी कायद्या अंतर्गतही गुन्हे शाखेने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.राजस्थानमधील जैसलमेर येथेही समीर विरोधात बनावट   नोटांप्रकरणी गुन्हा दाखल आहे.  डिग्गीवर तीन महिन्यांपूर्वीही जे.जे.मार्ग पोलिसांनी  भरधाव वेगात कार चालवून अपघातात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

खोट्या तक्रारीही करण्यात हातखंडा

आरोपी चालकाविरोधात अनेक पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. पण आरोपी स्वतःही इतरांवर खोट्या केसेस टाकण्यात कुख्यात होता. आरोपीने पत्नीच्या मदतीने 10 एप्रिल 2013 मध्ये इरफान शेख विरोधात गुन्हा दाखल केला होता. पण त्याचवेळी इरफान शेखची स्थिती गंभीर असल्यामुळे त्याच्यावर जीटी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यामुळे आरोपी समीरचे बिंग फुटले.

मोठी बातमी  खालापूर-खोपोलीतील बांधकाम व्यवसायानं पकडला वेग; थांबलेल्या कामांना सुरुवात

बॅग विक्री करून चरितार्थ चालवयाचा

कारच्या अपघातात मृत झालेले नईम हे फेरीवाले होते. रस्त्यावर फिरून बॅगा विकण्याचा त्यांचा व्यवसाय होता. त्यवर त्यांचा चरीतार्थ चालायचा. अपघातावेळी त्याच्या हातपाय दोनही मोडले होते. अशा अवस्थेत त्यांना जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाही.

फुटपाथवर बोलत उभ्या महिलांवर काळाचा घाला

या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सरोजा व झुबेदा दोघी फुटपाथवर एकमेकांशी बोलत उभ्या होत्या. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या कारने बाजूच्या चायनीज खाद्य विक्रेत्याचे सर्व सामान या महिलांच्या अंगावर कोसळले. त्यात जागीच त्यांचा मृत्यू झाला.

असद खालीद कुरेशी, प्रत्यक्षदर्शी

माझी घटनास्थळा जवळच मोबाईलचे दुकान आहे. अपघात झालात्यावेळी मी दुकानात होतो. त्यावेळी माझा भाऊही माझ्या सोबत होता. अपघातामुळे जोरदार आवाज आला. त्यामुळे मी तेथे धावलो. त्यावेळी कारच्या बोनेटवर दोन महिला पडल्या होत्या.सदानंद कॅफेपासून आरोपी चालक त्या महिला कारसोबत फरफटत घेऊन आला होता. त्यांच्या पाय मोडले होते. त्यानंतर कारने बॅग विक्रेत्याला धडक दिली.

( संकलन - सुमित बागुल ) 

case registered in crawford market hit and run case accused is arrant criminal

loading image