लॉकडाऊनमध्ये सोरायसिस बळावतोय, रूग्णांनो अधिक काळजी घ्या

मिलिंद तांबे
Sunday, 25 October 2020

कोरोनातील लॉकडाऊनमुळे अनेक रूग्णांना त्वचारोगतज्ज्ञांकडून उपचार घेता आले नाहीत

मुंबई : कोव्हिडमुळे सोरायसिसग्रस्त लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक रूग्णांना उपचार घेता आले नाहीत. त्यामुळे अनेक रूग्णांचा आजार बळावला असून नैराश्य आले आहे. याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

सोरायसिस हा ऑटोइम्युन प्रकारातला म्हणजे रोगप्रतिकारयंत्रणा अनियंत्रित पद्धतीने कार्यरत झाल्याने उद्भवणारा एक आजार असून यात त्वचेवरील पेशींची नेहमीपेक्षा खूपच वेगाने वाढ होते. सोरायसिसमध्ये दर 3 ते 4 दिवसांत नव्या त्वचापेशी तयार होतात, त्यामुळे जुन्या पेशी झडण्यासाठी शरीराला पुरेसा वेळ मिळत नाही. असे झाल्याने त्वचेवर या नव्या पेशींचा थर जमा होतो व त्वचा कोरडी, खाजरी बनते, तिचे पापुद्रे निघतात, तिच्यावर लाल चट्टे किंवा चंदेरीसर खवले दिसतात. दुर्लक्ष केल्यास हा आजार अधिक बळावण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. 

महत्त्वाची बातमी : दानवे यांचा बाप दिल्लीत असेल, माझा बाप माझ्यासोबत, नाव न घेता उद्धव ठाकरेंनी कंगनालाही सुनावलं

कोरोनातील लॉकडाऊनमुळे अनेक रूग्णांना त्वचारोगतज्ज्ञांकडून उपचार घेता आले नाहीत. त्यामुळे सोरायसिसग्रस्तांची लक्षणे खूप बळावली. सामाजिक आणि मानसिक ओझे वाढल्याने रुग्णांच्या एकूणच स्वास्थ्यावर विपरित परिणाम होत असल्याचे दिसते. लॉकडाउनमुळे यात भर पडली असून रुग्णांमधील तणाव तसेच नैराश्य वाढले आहे. या कसोटीच्या काळात रुग्णांनी आजाराच्या व्यवस्थापनाकडे सकारात्मक व सर्वांगीण दृष्टिकोनासह बघावे असा सल्ला इंडियन असोसिएशन ऑफ डर्माटोलॉजिस्ट्स, व्हेनेरिओलॉजिस्ट्स अँड लेप्रोलॉजिस्ट्सचे (आयएडीव्हीएल) राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉ. किरण गोडसे यांनी दिला आहे.

रुग्णांनी तणाव आणि मद्यपान टाळायला हवा. लक्षणे तीव्र करणारे निराळे घटक समजून घ्यायला हवेत. बायोलॉजिक्सचे उपचार सुरू ठेवायचे किंवा सुरू करण्याचा निर्णय डर्माटोलॉजिस्टने त्या-त्या रुग्णाबाबत केला पाहिजे. ऑनलाइन कन्सल्टेशनमुळे रुग्णांना उपचार सुरू ठेवण्यात किंवा डॉक्टरांचा सल्ला पाळण्यात उपयोग होऊ शकते. भारतीय वैद्यकीय परिषदेनेही टेलीकन्सल्टेशन अधिकृत व कायदेशीर केल्याने त्याचा फायदा रूग्णाने घ्यायला हवा असेही डॉ. गोडसे पुढे म्हणाले.

महत्त्वाची बातमी  "भाजपचा नेता व त्यांची दोन मुले तोंडात शेण घेवून ठाकरे घराण्यावर गोमुत्राच्या गुळण्या टाकत होते"

सोरायसिसचा लठ्ठपणा, कार्डिओव्हॅस्क्युलर आजार यांसारख्या समस्यांशीही घनिष्ट संबंध असल्याने या रूग्णांना कोविडचा धोकाही अधिक आहे. हे टाळण्यासाठी रूग्णाने आपले मित्र, कुटुंबीय यांना नियमितपणे भेटायला हवे.

चुकीची माहितीला बळी न पडता कामा नये. सोरायसिसची तीव्रता नियंत्रणात ठेवण्यासाठी या आजाराची लक्षणे नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. औषधोपचारांमध्ये खंड पडल्यास आहे ती स्थिती अधिक खालावून बिकट बनू शकते. त्यामुळे या आजाराकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन डॉ. गोडसे यांनी केले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

case of skin psoriasis increasing due to lack of treatment amid corona


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: case of skin psoriasis increasing due to lack of treatment amid corona