'चैत्य'वारी चुकली, संकल्प कायम; बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणार!

तेजस वाघमारे
Sunday, 6 December 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी यंदा अनुयायांना प्रत्यक्ष चैत्यभूमीवर येता न आल्याने त्यांच्या मनात हुरहुर कायम आहे. मात्र, बाबासाहेबांचे विचार समाजाच्या तळागाळात पोहोचवण्याचे कार्य करत राहण्याचा संकल्प यानिमित्ताने अनुयायांनी केला आहे.

मुंबई : दरवर्षी 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनुयायांना चैत्यभूमीवर येणे शक्‍य झाले नाही. त्यामुळे अनुयायांना प्रत्यक्ष चैत्यभूमीवर येता न आल्याने त्यांच्या मनात हुरहुर कायम आहे. मात्र, बाबासाहेबांचे विचार समाजाच्या तळागाळात पोहोचवण्याचे कार्य करत राहण्याचा संकल्प यानिमित्ताने अनुयायांनी केला आहे. 

आंबेडकरांच्या प्रेरणेतून अमेरिकेत कृष्णवर्णीयांचा लढा; "ब्लॅक लीडरशिप ऍनालिसीस'च्या माध्यमातून लोकचळवळ

मी अपंग असून पत्नीही मूकबधिर आहे. चालण्यासाठी मला व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागतो. गेल्या 25 वर्षांपासून मी न चुकता 6 डिसेंबरला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईला येतो. चैत्यभूमी ही माझ्यासाठी ऊर्जास्थान आहे. यंदा मुंबईला जाता येत नसल्याची खंत असली तरी जोपर्यंत अंगात रक्ताचा थेंब आहे, तोपर्यंत बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम करत राहणार आहे. 
- शाहीर सागर कांबळे, भुदरगड, कोल्हापूर. 

मी लहानपणापासून आई-वडिलांसोबत दरवर्षी चैत्यभूमीवर येते. चैत्यभूमीपासून जवळ राहूनही यंदा तिथे जाऊन बाबासाहेबांना वंदन करू शकणार नसल्याची खंत आहे. गेल्या चार वर्षांपासून आम्ही फेसबुक आंबेडकरी संघटनेच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांसाठी "वही पेन' मोहीम चालवतो. जमलेल्या वह्या, पेन आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये वाटप करतो. मात्र या वर्षी तेही करता येणार नसल्याची खंत आहे; मात्र कोरोना संपल्यावर बाबासाहेबांचे काम पुन्हा ताकदीने पुढे नेण्याचा संकल्प केला आहे. 
- स्नेहल जाधव, परळ 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा "त्रिसूत्री' शेतीविचार

मी गेली पंधरा वर्षें चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जातो, तसेच अनुयायांची सेवाही करतो. कोरोची परिस्थिती निर्माण झाली असली तरी सरकारने नियमांचे पालन करून अभिवादन करण्याची परवानगी द्यायला हवी होती. राज्यात निवडणुका, इतर कार्यक्रम होतात; मात्र अभिवादन करण्यासाठी अप्रत्यक्षरित्या बंदी घालणे योग्य नाही. बाबासाहेबांचे अनुयायी विज्ञानवादी आहेत. ते नियमांचे पालन करणारच. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करणे हे आमचे ध्येय आहे. 
- सुनील जाधव, काळाचौकी 

मी गेली वीस वर्षें चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करतो. यंदा कोरोनामुळे मला चैत्यभूमीवर जाता येत नाही, याची हुरहुर कायम राहील. परंतु बाबासाहेबांचे विचार सर्व समाजातील तरुणांपर्यंत पोचवण्याचा माझा संकल्प पूर्ण करण्यासाठी माझे काम समाज माध्यमातून सुरूच राहाणार आहे. 
- जितेंद्र तांबे, शिवडी.

---------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chaityawari missed but Babasaheb's determination to reach the grassroots remained