आंबेडकरांच्या प्रेरणेतून अमेरिकेत कृष्णवर्णीयांचा लढा; "ब्लॅक लीडरशिप ऍनालिसीस'च्या माध्यमातून लोकचळवळ

मिलिंद तांबे
Sunday, 6 December 2020

अमेरिकेसारख्या जागतिक महासत्ता असलेल्या देशातही कृष्णवर्णीय लोकांना आपल्या अधिकारांसाठी संघर्ष करावा लागतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून प्रेरणा घेत डेव्हिड हार्टफूल ज्युनिअर या तरुणाने "ब्लॅक लीडरशिप ऍनालिसीस' ही लोकचळवळ सुरू केली आहे. 

मुंबई : अमेरिकेसारख्या जागतिक महासत्ता असलेल्या देशातही कृष्णवर्णीय लोकांना आपल्या अधिकारांसाठी संघर्ष करावा लागतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून प्रेरणा घेत डेव्हिड हार्टफूल ज्युनिअर या तरुणाने "ब्लॅक लीडरशिप ऍनालिसीस' ही लोकचळवळ सुरू केली आहे. 

लोकनिधीतून उभारलेली चैत्यभूमी, जतन करण्याची लोकभावना

आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या डेव्हिड यांनी अनेक महान व्यक्तींबाबत वाचन केले. त्या वेळी त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी माहिती मिळाली. भारतातील दलित आणि अमेरिकेतील कृष्णवर्णीयांमध्ये अनेक बाबतीत साम्य आहे. दोघांनाही आपल्या अधिकारांसाठी झगडावे लागले. डॉ. आंबेडकरांच्या "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या विचारांनी आम्हालाही संघर्ष करायला प्रेरणा मिळाल्याची भावना डेव्हिड यांनी व्यक्त केली.

आज महापरिनिर्वाण दिन, पहिल्यांदाच चुकली चैत्यभूमीची वारी

डेव्हिड म्हणाले, की "डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल मी फेसबुक, इंटरनेटवर अनेक गोष्टी वाचल्या. तेव्हा मला कोलंबिया विद्यापीठाच्या संकेतस्थळावर डॉ. आंबेडकरांविषयी बरीच माहिती मिळाली. त्यावर अभ्यास करून मी त्याचा सारांश माझ्या ब्लॉगवर www.blackleaderanalysis.com पोस्ट केला आणि तेथूनच आंबेडकरी चळवळीला सुरुवात झाली. "बुद्ध किंवा कार्ल मार्क्‍स' हे मी वाचलेले आंबेडकरांचे पुस्तक. डॉ. आंबेडकरांच्या चवदार तळ्याचा सत्याग्रहने अमेरिकेतील तरुणांना प्रभावित केले. ब्लॉगच्या माध्यमातून मी आंबेडकरवाद अमेरिकन लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतात येऊन आंबेडकरांची कर्मभूमी तसेच त्यांच्याशी संबंधित प्रत्येक वास्तूला प्रत्यक्ष भेट देऊन डॉ. आंबेडकरांना अधिक जाणून घ्यायचे असल्याचेही डेव्हिड सांगतात. 

चैत्यभूमीला पोलिसांचा पहारा, शिवाजीपार्क पहिल्यांदाच मोकळे

सध्या केवळ ब्लॉगपुरती मर्यादित असलेली ही चळवळ अधिक जोमाने पुढे न्यायची आहे. आंबेडकरांच्या कल्पनांचा प्रचार करून जातीय दडपशाहीच्या विरोधात त्यांचा उपयोग करायचा आहे. भारतातील दलितांप्रमाणे अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या मुक्तीचा मार्ग ही बौद्ध धर्मातच असल्याचे मला वाटते. डॉ आंबेडकरांचे विचार केवळ अमेरिकेत नाही, तर जगभरातील संघर्ष करणाऱ्यांना प्रेरणा देणारे आहेत. 
- डेव्हिड हार्टफूल ज्युनिअर. 

-----------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Black struggle in America inspired by Ambedkar; People’s movement through ‘Black Leadership Analysis’