धारावीनंतरच्या 'या' सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोना रोखण्याचं आव्हान, पण..

shivajinagar
shivajinagar

मुंबई : लॉकडाऊन, संचारबंदीचा मानखुर्दच्या शिवाजीनगर भागात लवलेशही दिसत नाही. याच भागात आता कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे; मात्र तपासणीच होत नसल्याने रुग्ण सापडणार कसे, असा प्रश्‍न येथे उपस्थित होतो. हा विभाग अस्ताव्यस्त आणि अतिक्रमणांचा. उत्तर प्रदेश, बिहार, बंगालमधून पोट भरण्यासाठी आलेल्यांचे प्रमाण अधिक आहे.

अत्यंत गरिबी, अत्यंत दाटीवाटीच्या या भागात एका 10 बाय 12 च्या झोपड्यात 10 ते 12 लोक राहतात. अत्यंत मागासलेला आणि दुर्लक्षित हा भाग आहे. येथे सगळ्याच यंत्रणांनी हात टेकले आहेत. पोलिस, पालिका प्रशासन अशी कोणतीही व्यवस्था या ठिकाणी कोरोनाच्या काळात दिसत नाही. त्यामुळे या भागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दिसत आहे. 

धारावीशी स्पर्धा करणारी मुंबईतील मानखुर्द भागातील शिवाजीनगर झोपडपट्टी आहे. 7 लाख लोकसंख्या असलेली ही झोपडपट्टी देवनार डंपिंग ग्राऊंडच्या जागेत वसलेली आहे. हे सर्व अतिक्रमण आहे. लहानसहान उद्योग, कचरा गोळा करणे, भंगार व्यवसाय, डंपिंग ग्राऊंडच्या कचऱ्यातून आलेल्या वस्तू शोधून त्या वस्तू विकून रोजीरोटीचा प्रश्‍न सोडवणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. मिश्र लोकवस्तीचा हा विभाग कोरोनासाठी धोकादायक ठरण्याची शक्‍यता आहे. आता चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्ग आणि गोवंडी भागात कोरोनाच्या रुगणांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शिवाजी नगरात हा आजार शिरल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे पालिकेसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्‍यता आहे. धारावी अजूनही नियंत्रणात येत नाही. असे असताना गोवंडी, चेंबूर, शिवाजी नगर भागातीत कोरोनाला रोखणे जिकिरीचे होणार आहे. 

यंत्रणेचे दुर्लक्ष 
आरोग्य खात्याचे कर्मचारी अजूनही या भागात फिरकलेले नाहीत. कोरोना फैलावला असताना आरोग्य खात्याचे कर्मचारी या भागात फिरकले नसल्याचे या भागातील नागरिक सांगत आहेत. गेल्या आठवड्यात औषध फवारणी करण्यात आली; मात्र ती औषधफवारणी नव्हती, तर साबणाचा फेस करून फवारणी झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. 

गर्दुल्ल्यांची चंगळ 
या भागात गर्दुल्ले निर्धास्त आहेत. अमली पदार्थ त्यांना मिळत आहेत. त्यांचे भाव वधारले आहेत. तिप्पट-चौपट भावाने हे पदार्थ विकले जात आहेत. दारूही चोरीछुपे विकली जात आहे. सार्वजनिक मोडकळीस आलेली शौचालये त्यांचे अड्डे आहेत. 

लूटमारीचा धोका 
रेशनवर अन्नधान्यासाठी या भागात नागरिकांची झुंबड उडत आहे. या भागात लोकांना अन्नधान्य देणारी कोणतीही यंत्रणा नाही. भूक भागवण्यासाठी पर्याय नसल्याने या भागात भुकेसाठी लूटणार होण्याचा धोका आहे. 

शौचालये "कोरोना बॉम्ब' 
शिवाजी नगरातील 38 प्लॉटमध्ये 38 शौचालये आहेत. काही प्लॉटमध्ये तेथील नागरिक शौचालयांची लोकवर्गणीतून देखभाल करीत आहेत. 40 ते 45 शौचालयांपैकी निम्म्या शौचालयांची दुर्दशा झाली आहे. लोकसंख्येचा भार कमी शौचालयांवर पडत आहे. शौचालयांतील स्थानिकांची गर्दी कोरोना पसरवू शकते. 

दाटीवाटीची वस्ती... 

  • लोकसंख्या- 7 लाख 
  • झोपड्यांचे प्रमाण 100 टक्के 
  • धारावीप्रमाणे दाटीवाटीची वस्ती 
  • गुन्हेगारीचे प्रमाण अधिक 
  • उत्तर प्रदेश, बिहार, बंगाली नागरिकांची संख्या अधिक 
  • 70 टक्के मुस्लिम समाज 
  • शिवाजी नगर, रफिकनागर, लोटस कॉलनी, बैंगनवडी, गौतम नगर, म्हाडा कॉलनी, साठे नगर कोरोनाच्या रडारवर 

Challenge of preventing Corona in Shivajinagar area

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com