मुंबईत सण-उत्सवांदरम्यान संसर्ग रोखण्याचे आव्हान; गर्दीबरोबरच संसर्ग टाळण्यासाठी पालिका तत्पर

मिलिंद तांबे
Sunday, 18 October 2020

नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी सणांदरम्यान मुंबईत कोरोना संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान ठरणार आहे.

मुंबई ः नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी सणांदरम्यान मुंबईत कोरोना संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान ठरणार आहे. उत्सवादरम्यान मोठ्या संख्येने नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडत असून बाजारांत गर्दी पाहायला मिळते. या दरम्यान संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला असून त्यावर नियंत्रण आणणे आव्हानात्मक ठरणार आहे. गर्दीबरोबरच संसर्ग टाळण्यासाठी मुंबई महापालिका तत्पर असल्याचे सांगण्यात आले. 

दसऱ्यापर्यंत जीम सुरू होणार? जीम व्यवसायीकांशी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री सकारात्मक

मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसत असले तरी अनलॉक 5 नंतर कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढणे सुरू झाले आहे. त्याच दरम्यान गणेशोत्सव आल्याने नागरिक घराबाहेर पडू लागले. खरेदीसाठी बाजारांमध्ये गर्दी होऊ लागली. दरम्यान, रुग्णसंख्या वाढू लागल्याचे दिसते. अशीच परिस्थिती आताही होण्याची भीती व्यक्त होत आहे. नवरात्री, दसरा व दिवाळी एका मागोमाग असल्याने बाजारांमध्ये गर्दी वाढणार आहे. मुंबईतील नियंत्रणात आलेली रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याचा धोका आहे. 
कोरोना संपला असे म्हणता येणार नाही. अजूनही रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. सणवारांमुळे बाजारात गर्दी होत असल्याने संसर्ग वाढण्याची शक्‍यता अधिक आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य अध्यक्ष अविनाश भोंडवे यांनी सांगितले. गर्दीत जाणे टाळणे महत्त्वाचे असून, मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा वापर करणे आवश्‍यक असून सरकारी नियम पाळणे गरजेचे असल्याचेही भोंडवे म्हणाले. 

BREAKING : कंगना रानौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; वांद्रे न्यायालयाने दिले होते आदेश

नवरात्रीसह दिवाळी-दसरा यांसारखे मोठे सण मुंबईत मोठ्या उत्साहाने साजरे होतात. त्यावर बंधने आली असली तरी येत्या काही दिवसांत खरेदीसाठी बाजारातील गर्दी वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे गर्दीत न जाता प्रत्येकाने आपली काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे वन रूपी क्‍लिनिकचे प्रमुख डॉ. राहुल घुले यांनी सांगितले. 

मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात 
महिनाभरात ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या घटली आहे. मृतांचा आकडाही कमी झाला आहे. "माझे कुटुंब... माझी जबाबदारी' मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांच्या तपासणीसह जनजागृतीही करण्यात येत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आह. मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. पालिका यंत्रणा सज्ज असल्याचेही ते म्हणाले. 

बाजारपेठांमध्ये विशेष मोहीम 
दादर मोठी बाजारपेठ असल्याने दसरा-दिवाळीत ग्राहकांची तिथे गर्दी होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी आम्ही सर्व दुकानदारांना नोटिशीद्वारे मास्कशिवाय कोणाला प्रवेश न देण्याबाबत सूचना दिल्या आहेत, असे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले. उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. रस्त्यावर फेरीवाले बसू नयेत म्हणून खास भरारी पथक तयार ठेवले असून ते दिवसभर बाजारपेठ परिसरात फिरणार आहे. दादर रेल्वेस्थानक परिसरात मार्शल नियुक्त करण्यात आले असून त्यांच्यामार्फतही मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. अधिकाऱ्यांना दंड वसूल करण्याचे टार्गेट देण्यात आले असून नागरिकांना मास्कची सवय लागावी हा उद्देश आहे, असे दिघावकर यांनी सांगितले.-

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Challenges to prevent infection during festivals in Mumbai; The municipality is ready to prevent infection along with the crowd