भिवंडीत आगडोंब... रसायनांचे गोदाम पेटले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 मे 2020

भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील दौलत कम्पाऊंडमधील एका रासायनिक गोदामाला बुधवारी (ता. 6) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून गोदामातील रसायन मात्र जळून खाक झाले आहे

भिवंडी : तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील दौलत कम्पाऊंडमधील एका रासायनिक गोदामाला बुधवारी (ता. 6) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. गोदाम व बाहेरील परिसरातील रसायनांच्या पिंपामुळे आगीने भीषण रूप धारण केले. दरम्यान आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून गोदामातील रसायन मात्र जळून खाक झाले आहे.

मोठी बातमी : खरंच मुंबईत आर्मी येणार का?
 
आगीमध्ये रसायनांच्या पिंपाचे जोरजोरात स्फोट होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिस व अग्निशमन दलास  माहिती देताच भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यास सुरुवात केली. मात्र, तोवर आगीने ज्वालामुखीचे रूप धारण केले होते. त्यामुळे अखेर कल्याण-डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.

हे वाचलं का? : अनेक आयटीयन्सचा महाराष्ट्रात परतण्यास नकार

संचारबंदीमुळे भिवंडी तालुक्यातील सर्व उद्योग व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. गोदामसुद्धा बंद असताना आग कशी लागली, याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

गोदामांकडे सरकारचे दुर्लक्ष
भिवंडी तालुक्यातील विविध ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम करून गोदामे उभारण्यात आली आहे. गोदामांत मोठ्या प्रमाणात बेकायदा ज्वलनशील पदार्थाची साठवणूक केली जात असल्याचे आरोपही स्थानिकांतून होत आहेत. भिवंडीतील सर्व रासायनिक गोदामांबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व ठाणे जिल्हाधिकारी यांच्यासह सरकारकडे तक्रारी करूनसुद्धा अधिकारी  दुर्लक्ष करीत असल्याने भविष्यात आगीच्या घटनेतून मोठी जीवितहानी होण्याचा धोका स्थानिक व्यक्त  करत आहेत. नारपोली पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A chemical warehouse in Bhiwandi caught fire on Wednesday