मुंबई : आरोग्य विभागाच्या परीक्षेत ऐनवेळी सावळागोंधळ झाल्याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतली आहे. ‘वर्षा’ या निवासस्थानी याबाबत बोलावलेल्या विशेष बैठकीत ठाकरे यांनी ‘न्यासा’ या कंपनी विरोधात आज तीव्र नाराजी व्यक्त केली. आता नव्याने सदरील परीक्षेचे वेळापत्रक पाठवताना किमान नऊ दिवस अगोदर परीक्षार्थींना त्यांच्या परीक्षा केंद्राची सविस्तर माहिती द्या, असा आदेश देतानाच यामध्ये पुन्हा कुचराई झाली तर परीक्षा घेणाऱ्या संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी (CM) केली.
मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाच्या परीक्षेबाबत झालेल्या गोंधळावर बैठक बोलावली होती. यावेळी आरोग्य मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ज्या ‘न्यासा’ नावाच्या कंपनीला परीक्षा घेण्याचे अधिकार दिले त्या कंपनीची विश्वासार्हता तपासून पहा. कंपनीच्या आतापर्यंतच्या अनुभवाचाही आढावा सादर करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे समजते. रद्द झालेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेचे नव्याने वेळापत्रक ठरवताना काहीही त्रुटी राहू नयेत, अशा सूचना त्यांनी केल्या.
मंत्र्यांचा संताप
राज्यमंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीतही आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या गोंधळाच्या विषयावर चर्चा झाली. सर्व पक्षांच्या मंत्र्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचा मुद्दा अनेक मंत्र्यांनी मांडल्याचे समजते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही परीक्षा घेण्यासाठी नेमलेली कंपनी हा आमच्या खात्याचा नव्हे, तर सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय होता, असे म्हटले आहे. त्याबाबतही शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.