esakal | वसईत ख्रिश्चन धर्मीयांकडून केलं जातंय प्रेताचं दहन
sakal

बोलून बातमी शोधा

Christian-Cremation

दहन संस्कारानंतर चर्चच्या आवारात विधीवतरित्या दफन केली जाते राख

वसईत ख्रिश्चन धर्मीयांकडून केलं जातंय प्रेताचं दहन

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार: कोरोनामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत. रोज अनेक जण आपले प्राण गमावत असताना मृत्यू पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करताना अडचणी येत आहेत. यातूनच ख्रिचन धर्मीयांपुढे जागेची अडचण उभी राहणार असल्याने वसईतील अनेक चर्चमध्ये कोरोनाने मृत्यू पावलेल्यांना दफन करण्याऐवजी दहन करण्यात येत आहे. यातून दोन गोष्टी साध्य होत आहेत. एक म्हणजे जागेचा प्रश्न आणि दुसरी म्हणजे दफन केल्यावर भविष्यात होणाऱ्या दुष्परिमाणापासून मानवाची सुटका. यामुळे अनेक जण दफन करण्याऐवजी प्रेताचे दहन करण्यावर भर देत आहेत.

हेही वाचा: धक्कादायक! मृतदेह बांधणीसाठी रुग्णालयाकडून पैशांची मागणी; नातेवाइकांचा आरोप

कोरोनाने आज शेकड्याने लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्यांच्यावर अंत्यसंस्कार कसे करायचे? असा प्रश्न पडत आहे. अशा परिस्थितीत वसईमध्ये मात्र ख्रिचन धर्मीयांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. ख्रिश्चन धर्मात माणूस मृत्युमुखी पडल्यावर त्याचे दफन चर्चच्या आवारात करण्यात येते. ज्या ठिकाणी दफन केले जाते त्या जागेवर ३ वर्षानंतर पुन्हा दुसऱ्याचे दफन केले जाते. परंतु आजच्या कोरोनाच्या काळात माणसे मृत्युमुखी पडण्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे चर्चच्या आवारातील जागा तर कमी पडत आहेच, परंतु कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांचे दफन केल्यास त्या जागेवर जवळपास १० वर्षे तरी दुसऱ्याचे दफन करता येणार नाही, असे चित्र आहे. त्यातच दफन केल्याने त्याचा वेगळा परिणाम भविष्यात होऊ नये, यासाठी चर्चच्या वतीने मृत्युमुखी पडलेल्यांच्या घरातल्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली जात आहे. त्यांच्यात जनजागृती केली आज आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी सांगितल्यावरच पुढचे विधी केले जात आहेत. मृतावर दहन संस्कार केल्यानंतर त्याची राख चर्चच्या आवारात विधीवतरित्या दफन केली जात आहे. त्यामुळे मृत पावलेल्यांवर धार्मिक प्रथेप्रमाणे विधी केले जात आहेत.

हेही वाचा: 'स्मशानभूमीत जागा नसेल तर रुग्णालयातून मृतदेह बाहेर काढू नका'

शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार, चर्चच्या आवारात कोरोनाशिवाय मृत पावलेल्यांवर अंत्यविधी केले जात आहेत. या अंत्यविधीसाठी फक्त दहा लोकांनाच प्रवेश दिला जात आहे. अंत्यविधीपूर्वी त्यासाठी उपस्थित राहणाऱ्यांच्या नावाची यादी आल्यावरच चर्चच्या आवारात मृतव्यक्तीला दफन केले जात आहे. ख्रिचन धर्मीयांनी कोरोनाच्या काळात भविष्याचा वेध घेऊन शासनाच्या नियमाचे पालन करून एक वेगळा आदर्श समाजापुढे उभा केला आहे.

ख्रिचन धर्मात दहन आणि दफन दोन्ही श्रद्धेला धरून आहे. या परिस्थितीत लोकांना विश्वासात घेऊन प्रत्येक चर्च आपापल्या परीने काम करत आहे. त्याची स्वायत्तता चर्चला देण्यात आली आहे. या अगोदर दफन केलेल्या ठिकाणी 3 वर्षाने दुसऱ्याला दफन करता येत होते. परंतु कोरोनाने मृत्यू पावलेल्यांना दफन करण्यासाठी खड्डा खोल करावा लागतो आणि त्या जागेवर कमीत कमी 10 वर्षे दुसऱ्याला दफन करता येणार नाही. याबाबत मृतांच्या नातेवाईकांचे प्रबोधन करण्यात येत आहे आणि त्यांच्या सांगण्यानुसार अंत्यसंस्कार केले जात आहेत.

-फादर रिचर्ड डाबरे , बिशपांचे सचिव

हेही वाचा: 'मला कोरोना झाला अन् तब्बल चार तास माझे पती बेडसाठी वणवण हिंडत राहिले'

माणिकपूर येथील सेंट मायकल चर्च मध्ये कोरोना ने मृत पावलेल्यावर दफन करण्यात येत नाही. त्यांना दहन करण्यात येत आहे. आतापर्यंत 50 च्या आसपास लोकांना दहन करण्यात आले आहे. त्यात २ फादर यांचाही समावेश आहे.

(संपादन- विराज भागवत)

loading image
go to top