नको मारू रे पिचकारी; चौका-चौकात पुन्हा सुरू...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 February 2020

शहरात हॉटेल, रेस्टॉरन्ट आणि विविध मोक्‍यावरील चौका-चौकात पुन्हा एकदा महापालिकेच्या विभाग अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या कृपादृष्टीमुळे पान-टपऱ्या उघडण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे याला अन्न व औषध प्रशासनातर्फेही खुली सूट दिली जात आहे.

नवी मुंबई : शहरात हॉटेल, रेस्टॉरन्ट आणि विविध मोक्‍यावरील चौका-चौकात पुन्हा एकदा महापालिकेच्या विभाग अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या कृपादृष्टीमुळे पान-टपऱ्या उघडण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे याला अन्न व औषध प्रशासनातर्फेही खुली सूट दिली जात आहे. केंद्र सरकारतर्फे शहरात "स्वच्छ भारत मिशन'अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण सुरू होते. या सर्वेक्षणाला सिगारेट, पान-तंबाखू व गुटखा खाणाऱ्यांकडून काळिमा फासला जात होता. त्यामुळे या काळात बेलापूर, नेरूळ, वाशी अशा महत्त्वाच्या परिसरातील पान-टपऱ्या बंद केल्या होत्या. मात्र, आता सर्वेक्षण झाल्यानंतर पुन्हा एकदा बंद झालेल्या पान-टपऱ्या खुल्या करण्यासाठी विभाग कार्यालयातर्फे वाट मोकळी करून देण्यात आली आहे. 

ही बातमी वाचली का? 'हे' ११ नगरसेवक करणार राष्ट्रवादीत घरवापसी; गणेश नाईकांना मोठा धक्का...

अन्नसुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासनातर्फे जानेवारी 2018ला अन्नसुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 18 नुसार मानवी जीवनाच्या आरोग्यासाठी व ग्राहकांच्या हितांच्या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक ती उपाययोजना करण्याची केंद्र सरकार, राज्य सरकार व अन्न सुरक्षा प्राधिकरण यांची जबाबदारी असणारे एक परिपत्रक काढण्यात आले आहे. शहरातील छोट्या पान दुकानात तंबाखूसोबत टॉफीज, चॉकलेट्‌स, चिप्स, बिस्किटे, शीतपेये आदी पदार्थांची विक्री केली जाते. बहुतांश पान-टपऱ्या या हॉटेल्स व रेस्टॉरन्टच्या बाहेरील जागेवर थाटलेल्या आहेत. हॉटेलमध्ये जेवायला येणाऱ्या कुटुंबांमध्ये अनेकदा लहान मुले असतात. ही लहान मुले त्या पान-टपऱ्यांवर इतर पदार्थ आणायला जाताना तंबाखूजन्य वस्तू घेण्याची शक्‍यता अन्न व औषध प्रशासनातर्फे वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील अशा पान-टपऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार घणसोली, ऐरोली व वाशीमध्ये काही पान-टपऱ्यांवर विभाग अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. मात्र दिखाव्यापुरती सुरू असलेली ही कारवाई थांबल्यानंतर पुन्हा या पान-टपऱ्यावाल्यांनी त्यांचे संसार थाटण्यास सुरुवात केली आहे. 

ही बातमी वाचली का? चीनहून परतला, अन् त्याला भरली कोरोनाची धडकी!

स्वच्छ सर्वेक्षण संपताच पुन्हा बस्तान 
शहरात स्वच्छ सर्वेक्षण सुरू असल्यामुळे अनेकदा स्वच्छ केलेले रस्ते, पदपथ, रस्त्यालगतच्या भिंतींवर पान-तंबाखू व गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारल्या जात होत्या. त्यामुळे स्वच्छ असलेली जागा पुन्हा खराब दिसून स्वच्छतेवर पाणी फेरले जात होते. त्यामुळे विभागप्रमुखांनी शहरातील मोक्‍याच्या जागेवर असणाऱ्या पान-टपऱ्या बंद केल्या होत्या. परंतु आता सर्वेक्षणाचे काम संपल्यानंतर शहरात पुन्हा एकदा नाक्‍या-नाक्‍यावर व चौकातील पान-टपऱ्या खुल्या झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cigarettes, tobacco and gutkha in the city resume