टप्प्याटप्प्याने उद्योग सुरू करावेत - CII, जाणून घ्या सुचवलेले 'तीन' टप्पे..

 टप्प्याटप्प्याने उद्योग सुरू करावेत - CII, जाणून घ्या सुचवलेले 'तीन' टप्पे..

मुंबई : देशात लॉकडाऊन असल्यामुळे अनेक ठिकाणी कोरोनाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे सुरक्षितता राखून, टप्प्याटप्याने लॉकडाऊन उठवावे, अशी शिफारस सीआयआय या उद्योजकांच्या संघटनेने सरकारला केली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येनुसार सरकारने रेड, ऑरेंज व ग्रीन झोन असे वर्गीकरण केले आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने उद्योग सुरू करावेत, असे सीआयआयच्या अहवालात म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे, उद्योग पुन्हा सुरू करताना काय काळजी घ्यावी, याचा तपशीलही देण्यात आला आहे. 

पहिला टप्पा 
- अत्यावश्‍यक सेवा आणि वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग. 
- वस्त्रोद्योग, औषध निर्माण, अन्नप्रक्रिया, खनिज आणि धातू. 

दुसरा टप्पा 
- मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करणारे उद्योग. 
- ई कॉमर्स (अन्न, किराणा आणि औषध पुरवठा). 
- शेती आधारित (बाजार समित्या, कृषी केंद्रे), ऑटोमोबाईल, रासायनिक. 

तिसरा टप्पा 
- निर्यातक्षम उद्योगांना प्राधान्य. 
- बांधकाम, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, हॉटेल, किरकोळ विक्री, औद्योगिक वस्तू, अभियांत्रिकी. 

सरकारने मदत करावी 
लॉकडाऊनमुळे उद्योगांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सरकारने उद्योगांना आर्थिक मदत करावी. बॅंकांनी उद्योगांना अतिरिक्त भांडवल पुरवावे. कामगारांच्या तीन महिन्यांच्या वेतनाएवढे कर्ज दरसाल 3 ते 5 टक्के व्याजदराने उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी सरकारने हमी घ्यावी. कोरोनाचा सर्वांत जास्त फटका बसलेल्या बांधकाम, हवाई वाहतूक आणि पर्यटन क्षेत्राला सवलती द्याव्यात. 

कामगारांची काळजी घ्या 
स्थलांतरित कामगारांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कामगारांना रोख पैशाऐवजी रेशन पुरवावे. त्यामुळे भाववाढ आटोक्‍यात राहण्यास मदत होईल व गरजेच्या वस्तूंव्यतिरिक्त अन्य बाबींवर खर्च होणार नाही. कामगारांना निवारा आणि जेवणाची व्यवस्था करणे आवश्‍यक आहे. 

कामगारांचा विश्‍वास परत मिळवणे 
स्थलांतरित कामगारांना परत आणण्यासाठी त्यांचा विश्‍वास मिळवणे महत्त्वाचे आहे. कामगारांचे आरोग्य, निवारा, भोजन आदी व्यवस्था करावी लागेल. आरोग्य विमा काढण्यासाठी कामगारांशी संवाद साधला पाहिजे. त्यासाठी सरकार, कामगार संघटना आणि उद्योग संघटनानी पुढाकार घ्यावा आणि कामगारांची संपूर्ण माहिती सरकारला द्यावी. 

राज्य आणि केंद्राचा समन्वय 
अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर आणण्यासाठी केंद्र आणि राज्यांचा समन्वय महत्त्वाचा आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्यांच्या पातळीवर टास्क फोर्सची निर्मिती करावी. त्यामध्ये उद्योजकांच्या संघटनांना प्रतिनिधित्व द्यावे. 

कामगारांची सुरक्षितता 
उद्योग सुरू करताना स्वच्छता, कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग यांसारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना कामावर ठेवू नये. फेस मास्क, सॅनिटायझर आदी साधने पुरवावीत. कामगारांची नियमित वैद्यकीय तपासणी करावी. नियम मोडणाऱ्या उद्योजकांना आर्थिक दंड करावा. 

सोशल डिस्टन्सिंग 
उद्योजकांनी कामाच्या स्थळी सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळावे. दोन-तीन शिफ्टमध्ये काम करावे. कॅंटीनमध्ये एकाच वेळेत सर्व कर्मचारी येऊ नयेत, याची काळजी घ्यावी. मोठ्या उद्योगांनी कामगारांच्या राहण्याची व्यवस्था करावी, तर लहान उद्योजकांनी कामगारांची एकाच बसने ने-आण करणे टाळावे. 

रस्ते वाहतूक 
सध्या रस्त्यावर केवळ 10 टक्के वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतूक सुरळित होण्यासाठी केंद्र सरकारने नियमावली तयार करावी. चालकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने आरोग्य विम्याचे हप्ते भरावेत. रस्त्यांच्या बाजूची वाहन दुरुस्ती दुकाने उघडी ठेवावीत.

CII suggest withdrawal of lockdowan in three different stages read what are their suggestions 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com