अतिधोकादायक इमारतींबाबत भिवंडी महापालिकेचा 'मोठा' निर्णय; नागरिकांना केले महत्त्वाचे आवाहन...

शरद भसाळे
Monday, 31 August 2020

भिवंडी शहरातील अतिधोकादायक इमारती, मालमत्ता पूर्णपणे निर्मनुष्य करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी नागरीकांनी सहकार्य करून अशा इमारतींचा वापर टाळावा व तसेच अनधिकृत इमारतींमध्ये मालमत्ता खरेदी करू नये, असे आवाहन भिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. 

भिवंडी : भिवंडी शहरातील अतिधोकादायक इमारती, मालमत्ता पूर्णपणे निर्मनुष्य करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी नागरीकांनी सहकार्य करून अशा इमारतींचा वापर टाळावा व तसेच अनधिकृत इमारतींमध्ये मालमत्ता खरेदी करू नये, असे आवाहन भिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. 

ही बातमी वाचली का? पालघर साधू हत्या प्रकरणी, ठाकरे सरकारची मोठी कारवाई; 17 पोलिस अधिकाऱ्यांना दणका

शहरातील अतिधोकादायक व अनधिकृत मालमत्तांसंदर्भात सोमवारी (ता.31) सकाळी आयोजित केलेल्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. या बैठकीस मुख्यालय व अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. दीपक सावंत, नगररचना सहाय्यक संचालक प्रल्हाद होगे पाटील, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, मिलिंद पळसुले आदी अधिकारी उपस्थित होते.

ही बातमी वाचली का? राज्य सरकारने प्रस्ताव दिल्यास रेल्वे तयार; नीट,जेईई विद्यार्थ्यांच्या प्रवासावरून श्रेयवादाची लढाई सुरू

शहरातील सर्व अतिधोकादायक मालमत्तांना राज्य सरकारच्या महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 च्या कलम 268 अनव्ये नोटीस बजावून मिळकती रिकाम्या करण्याबाबत बजावले आहे. शहरात सध्या अतिधोकादायक 25 इमारती असून, त्यापैकी 6 इमारती तोडण्यात आल्या  आहेत. तर 19 मालमत्ता निर्मनुष्य करून तोडण्याची कारवाई सुरू आहे. धोकादायक वर्गात 82 इमारतींचा समावेश होत आहे. त्यापैकी 77 निर्मनुष्य करण्यात आल्या असून, तीन इमारतींबाबत न्यायालयीन प्रकरण सुरू आहे. तर दोन इमारतींवर लवकरच कारवाई होणार असल्याची माहिती आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी दिली आहे.

ही बातमी वाचली का? उदय सामंत यांची पत्रकार परिषद, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

यासोबतच शहरातील नादुरुस्त 222 इमारतींना नोटीस बाजाविण्यात आल्या असून, अशा इमारतींचा पाणी व विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरूआहे. ज्या इमारतींबाबत बांधकाम स्थापत्य समितीच्या तज्ञांनी सुचविलेली संरचनात्मक संभाव्य बदल करून मालमत्ता वापरण्यास योग्य असल्याचे स्थापत्य प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. परंतु अनेक मालमत्ता धारकांनी असे केल्याचे आढळून येत नसल्याने, धोकादायक इमारत पडून वित्त अथवा जीवितहानी झाल्यास त्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही. असा इशारा त्यांनी आयुक्त डॉ. आशिया यांनी दिला आहे.

अनधिकृत इमारतींना पाणीपुरवठा, मलनि:सारण ,व विद्युत जोडणी देण्यात येणार नसून, अशा मालमत्तांचे हस्तांतरण करण्यात येणार नाही. त्यामुळे नागरीकांनी सावधानता बाळगत अनधिकृत इमारतींमध्ये घर खरेदी करू नये.
- डॉ. पंकज आशिया, आयुक्त, भिवंडी महापालिका

------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens should avoid use of high-risk buildings, should not buy property in unauthorized buildings says Commissioner Dr. Pankaj Asia