
नवी मुंबई : स्वच्छतेत राज्यात पहिला आणि देशात सातवा क्रमांक
पटकावणाऱ्या महापालिकेने आता पुन्हा एकदा देशात पहिला क्रमांक
पटकावण्यासाठी कंबर कसली आहे. स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचण्यासाठी
पालिकेतर्फे शहरातील भिंती रंगवण्यात येणार आहेत. बेलापूरपासून ते
दिघापर्यंतच्या विविध नोडमध्ये तब्बल दोन लाख चौरस फुटांपर्यंतच्या भिंतींवर
स्वच्छतेचा संदेश देणारे वेगवेगळे देखावे साकारले जाणार आहेत.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत स्वच्छता अभियान संपूर्ण शहरभर राबवत
असताना नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळवण्यासाठी महापालिकेतर्फे नव्या
वर्षात विविध उपक्रम आखले जात आहेत. शहर कायम स्वच्छ ठेवण्यासाठी
नागरिकांना सवय लावण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्याकरिता स्वच्छतेची
मोहीम घराघरात जाणे क्रमप्राप्त आहे. त्याकरिता पालिकेने विविध सरकारी व
खासगी शाळांना लक्ष्य केले आहे. परंतु, शहरात फिरताना आणि वावरताना सर्व
ठिकाणी स्वच्छतेबाबत वेळोवेळी आठवण करून देणारे संदेश असावेत याकरिता
भिंती रंगवण्याचा उपक्रम पालिकेतर्फे राबवला जाणार आहे. शहरातील भिंती
रंगवण्यासाठी विविध महाविद्यालयांतील होतकरू तरुण, चित्रकार आदींची
मदत घेतली जाणार आहे.
गेल्या वर्षीदेखील पालिकेने बेलापूर, नेरूळ, वाशी, ऐरोली, कोपरखैरणे या
भागांत रेल्वे स्थानक, सरकारी कार्यालये, उद्यान आदी भागांतील भिंतींवर
विविध देखावे साकारले होते. शहरातील भिंती रंगवल्यामुळे शहराचे रूपडे
पालटले होते. तरुण-तरुणी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये चांगली
जनजागृती झाली होती. काही भिंतींवरील देखावे तर सेल्फी पॉइंट तयार झाले
होते. त्यामुळे समाजात स्वच्छतेबाबत चांगला संदेश प्रसारित होण्यास मदत
मिळाली होती. भिंतींबरोबरच एनएमएमटी, बस थांबे, रिक्षा, सिनेमागृह, रेडिओ
आदी ठिकाणांवरही जनजागृती केली जाणार आहे. तसेच स्वच्छता संदेश
देणाऱ्या मॅरेथॉनचे आयोजन येत्या ५ जानेवारीला केले जाणार असल्याची
माहिती पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली.
स्वच्छतेचा संदेश
बेलापूर, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली
व तुर्भे या विविध नोडमधील तब्बल दोन लाख चौरस फूट भिंती रंगवण्यात
येणार आहेत. या भिंतींवर कौटुंबिक, सहली, खेळ, ऐतिहासिक, सिनेमा अशा
विविध विषयांवर देखावे साकारून स्वच्छतेचा संदेश दिला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.