esakal | नाहीतर तो प्रकल्प मी रद्द करेन, मुख्यमंत्र्यांकडून भाजपला मोठा हादरा
sakal

बोलून बातमी शोधा

नाहीतर तो प्रकल्प मी रद्द करेन, मुख्यमंत्र्यांकडून भाजपला मोठा हादरा

भारतातील पहिली बुलेट ट्रेन हा भाजपचा मोठा प्रकल्प आहे. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांसह भाजपला मोठा हादरा दिला आहे.

नाहीतर तो प्रकल्प मी रद्द करेन, मुख्यमंत्र्यांकडून भाजपला मोठा हादरा

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः अहमदाबाद -मुंबई बुलेट ट्रेन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे. भारतातील पहिली बुलेट ट्रेन हा भाजपचा मोठा प्रकल्प आहे. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांसह भाजपला मोठा हादरा दिला आहे. कोरोना व्हायरसमुळे राज्यावर सध्या आर्थिक संकट कोसळलं आहे. त्यामुळे आर्थिक संकट आणि जनतेचं हित बघून एखादी भूमिका मी एकतर्फी घेतली असेन आणि आता ती भूमिका योग्य वाटत नसेल तर तो प्रकल्प मी रद्द करेन, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. 

२५०-३०० कोटी मी का द्यावे. मुंबई-सूरत बुलेट ट्रेनमधून काही फायदा होणार आहे का? दाखवा आम्हाला, काय होणार फायदा? किती मुंबईतून आणि सूरतमधून ये-जा होणार आहे? किती आर्थिक घडामोड होणार आहे? हे सरकार म्हणून मला माहिती मिळू द्या. जर पटली तर जनतेसमोर ठेवतो, पण एखादी भूमिका मी एकतर्फी घेतली असेल आणि आता अयोग्य वाटत असेल तर तो प्रकल्प मी रद्द करेन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला. या भागात मुख्यमंत्र्यांनी राम मंदिराला जाण्यापासून ते राज्यातील राजकीय विषयांवर परखड मत व्यक्त केले आहे. 

अधिक वाचाः महाविकास आघाडीचं सरकार कसं चाललंय? उद्धव ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर

बुलेट ट्रेन जरी असली तरी बुलेट ट्रेनचा विषय बॅकसीटला गेला, त्यावर काही चर्चा झालेली नाही किंवा कोणी विचारपूसही करत नाही. राज्य म्हणून बुलेट ट्रेनची आवश्यकता असेल तर मी म्हणेन, माझ्या मुंबई-नागपूरला जोडणारी बुलेट ट्रेन द्या. माझी राजधानी आणि उपराजधानी जोडणारी ट्रेन द्या. जेणेकरून विदर्भाच्या मनात कारण नसताना जो दुरावा करून दिला जाण्याचा प्रयत्न केला जातो, तो दुरावा नष्ट होईल, असंही मुख्यमंत्री म्हणालेत. 

जसा समृद्धी महामार्ग होतोय, त्याला आता शिवसेनाप्रमुखांचं नाव दिलं आहे. तसंच मुंबई-नागपूर जोडणारी बुलेट ट्रेन द्या. मला आनंद होईल, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट मत मुलाखतीत मांडलंय. 

हेही वाचाः  राम मंदिर भूमिपूजनाला तुम्ही जाणार का?, मुख्यमंत्र्यांनी पहिल्यादांच दिलं 'हे' उत्तर

बुलेट ट्रेनची गरज नाही असे आपणही म्हणाला होतात. शरद पवारही म्हणाले होते. बुलेट ट्रेनचा आपल्या राज्याला फायदा नसल्याने आपल्या राज्याने गुंतवणूक करणं योग्य नाही. तरीही महाराष्ट्रात साठ टक्के जमीन संपादन झालीय आतापर्यंत. त्यामुळे बुलेट ट्रेनचं नक्की भविष्य काय?' असा सवाल राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. 

त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले,  भूसंपादन करताना ज्यांचा विरोध झालाय त्यांच्या मागे शिवसेना आहे. शिवसेना पक्ष म्हणून ठाम उभी आहे. सरकार म्हणून जे काही करायचंय तो निर्णय आपण घेऊच, पण ज्यांचा ज्यांचा विरोध आहे, त्यांच्या मागे शिवसेना आहे. आता काही जणांनी स्वत:हून जमीन दिली असेल तर काय करणार? 

अधिक वाचाः शानदार विजय! 45 दिवसांच्या लढाईनंतर 80 वर्षीय आजोबा कोरोनामुक्त; नायर रुग्णालयात यशस्वी उपचार

२५०-३०० कोटी मी का द्यावे. मुंबई-सूरत बुलेट ट्रेनमधून काही फायदा होणार आहे का? दाखवा आम्हाला, काय होणार फायदा? किती मुंबईतून आणि सूरतमधून ये-जा होणार आहे? किती आर्थिक घडामोड होणार आहे? हे सरकार म्हणून मला माहिती मिळू द्या. जर पटली तर जनतेसमोर ठेवतो, पण एखादी भूमिका मी एकतर्फी घेतली असेल आणि आता अयोग्य वाटत असेल तर तो प्रकल्प मी रद्द करेन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

cm uddhav thackeray react on modi dream project mumbai ahmedabad bullet train