कांदा साठवणुकीबाबत मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र; शेतकरी, व्यापाऱ्यांना अनेक अडचणी

सकाळ न्यूज नेटवर्क 
Saturday, 31 October 2020

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी साठवणूक मर्यादा ही 25 मे.टनावरून वाढवून 1500 मे.टन करावी

मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी साठवणूक मर्यादा ही 25 मे.टनावरून वाढवून 1500 मे.टन करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

वेब सिरिज पाहत असल्यामुळे वाचले 75 लोकांचे प्राण; मोठा अनर्थ टळला

केंद्र सरकारने गुरुवारी (ता.29) दिलेल्या सूचनेप्रमाणे एपीएमसीतील कांदा खरेदीच्या दिनांकापासून ग्रेडींग/ पॅकेजिंगसाठी तीन दिवसांचा कालावधी दिला आहे. हा कालावधीही खूप कमी असून तो सात दिवसांचा करण्यात यावा. केंद्राने 23 ऑक्‍टोबर 2020 रोजी जीवनावश्‍यक वस्तू कायद्यातील नियंत्रण आदेशात सुधारणा करून घाऊक कांदा व्यापाऱ्यांसाठी 25 मे.टन तर किरकोळ कांदा व्यापाऱ्यांसाठी केवळ 2 मे. टनापर्यंत साठवणुकीचे निर्बंध घातले आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

पुरवठा साखळीवर परिणाम 
केंद्र सरकारने जीवनावश्‍यक वस्तू कायद्यातील नियंत्रण आदेशात सुधारणा केल्याने केवळ 25 मे.टन साठवणुकीच्या मर्यादेमुळे सध्या एपीएमसीमधील कांदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणे थांबवले आहे. त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर होत आहे. परिणामत: किरकोळ बाजारात कांद्याचे भाव वाढताना दिसत असून त्याचा ग्राहकांवर भार पडत आहे. 

मुंबई पालिकेकडे अपुरे स्वच्छता निरीक्षक; कोव्हिड काळात संख्या वाढवण्याची गरज 

लॉकडाऊनमुळे आधीच फटका 
खरिपाचा कांदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येणे सुरू होणे अपेक्षित आहे. खरिपाचा कांदा अत्यंत नाशवंत स्वरूपाचा असतो. त्यामुळे जर सध्याच्या साठवणूक क्षमतेच्या निकषामुळे व्यापाऱ्यांकडून हा कांदा खरेदी झाला नाही; तर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार आहे. मागील सहा महिन्यांत कोविड 19 च्या लॉकडाऊन काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आधीच मोठे नुकसान सोसले आहे. ही परिस्थिती पाहता एपीएमसीमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची कांदा साठवणूक क्षमता ही 1500 मे.टन करावी, अशी मागणी करण्यात येत आहे, असेही ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

बाळासाहेब ठाकरे ट्रामा केंद्रातील कंत्राटी कामगारांना भत्त्यांची प्रतीक्षा

100 लाख मे.टन कांदा 
रब्बी कांदा उत्पादनात महाराष्ट्र देशातील अग्रगण्य राज्य असून एकूण उत्पादनाच्या एक तृतीयांश उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. देशाच्या एकूण कांदा निर्यातीमध्ये ही महाराष्ट्राचा हिस्सा 80 टक्के असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे. यासंबंधी अधिक माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी मागील हंगामात रब्बी हंगामातील कांदा उत्पादनाचे क्षेत्र वाढले असून, अंदाजे 100 लाख मे.टन कांद्याचे उत्पादन झाल्याची माहिती दिली आहे

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CMs letter to Center regarding onion storage Many difficulties for farmers and traders