ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी जिल्हा, विभागीय स्तरावर समित्या; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी जिल्हा, विभागीय स्तरावर समित्या; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती


मुंबई : कोरोनाच्या काळात गंभीर रुग्णांना उपचारासाठी वेळेवर ऑक्सिजन मिळावा तसेच ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा, यासाठी जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावर समित्या तसेच, जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे. आपत्कालिन परिस्थितीत प्रत्येक महसूल विभागाच्या मध्यवर्ती ठिकाणी 50 ड्युरा सिलेंडर आणि 200 जम्बो सिलेंडर यांचा राखीव साठा ठेवण्याबाबत विभागीय आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी राज्य सरकारमार्फत उपाय योजना करण्यात आल्या आहेत. आरोग्यमंत्री टोपे यांनी राष्ट्रीय ऑक्सिजन उत्पादक संघटनेच्या अध्यक्षांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून राज्याला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा व्हावा, यासाठी सूचना दिल्या आहेत. राज्याची ऑक्सिजनची गरज 400 मेट्रिक टन एवढी असून उत्पादन क्षमता 1081 मेट्रिक टन आहे. सध्या राज्यात ऑक्सिजनचे जम्बो सिलिंडर 17 हजार 753, बी टाईप सिलिंडर 1547, डयुरा सिलिंडर 230, लिक्विड क्रायोजनिक ऑक्सिजन टँक 14 असून आणखी 16 ठिकाणी काम सुरु आहे. राज्यात आढळणाऱ्या कोरोना रुग्णांपैकी सरासरी किती रुग्णांना ऑक्सिजन बेड लागतात याचा विश्लेषणात्मक आढावा घेऊन प्रत्येक जिल्हा आणि महापालिका कार्यक्षेत्रात त्यानुसार ऑक्सिजन बेड उपलब्ध असावेत याकरीता योग्य ती कार्यवाही करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

ऑक्सिजन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये अन्न व औषध प्रशासन, उद्योग विभाग, परिवहन विभाग आणि सार्वजनिक आरोग्य या विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ऑक्सीजन पुरवठ्यामध्ये समन्वय साधण्यासाठी विभागीय स्तरावर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली याच प्रकारे समितीचे गठन करण्यात आले आहे. राज्यस्तरावर आरोग्य सेवा आयुक्त यांच्यासोबत अन्न व औषध प्रशासन, उद्योग विभाग आणि परिवहन अधिकारी यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष
जिल्हा स्तरावर आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत पावसाळ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाकडे ऑक्सिजन पुरवठ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2020पर्यंत हा नियंत्रण कक्ष सुरू राहिल. राज्यस्तरावरदेखील आॅक्सिजन पुरवठ्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत असेच नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून त्याचा दूरध्वनी क्रमांक 022- 26592364 आणि टोल फ्री क्रमांक 1800222365 देखील जाहीर करण्यात आला आहे. 

ऑक्सिजन टँक स्थापन करावेत  
राज्यातील शंभर किंवा त्याहून अधिक खाटा असलेल्या सर्व सार्वजनिक रुग्णालयांनी जिल्हा नियोजन व विकास परिषद किंवा राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी अथवा कार्पोरेट सामाजिक जबाबदारीमधून निधी प्राप्त करून क्रायो ऑक्सीजन टँक स्थापन करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या रुग्णालयांना निधीची अडचण येईल, त्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयाशी संपर्क साधण्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com