महाराष्ट्राबाबत देशात चिंता; महामुंबई, पुण्यामुळे परिस्थिती चिघळली

मृणालिनी नानिवडेकर
गुरुवार, 9 एप्रिल 2020

संपूर्ण देशातील परिस्थितीकडे लक्ष ठेवणाऱ्या केंद्रीय नियंत्रण कक्षाने महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्‍त केली आहे. राज्य सरकार कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत असले, तरी सर्वाधिक गुंतवणूक खेचणाऱ्या महामुंबई (एमएमआरडीए) क्षेत्रातच सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

मुंबई : संपूर्ण देशातील परिस्थितीकडे लक्ष ठेवणाऱ्या केंद्रीय नियंत्रण कक्षाने महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्‍त केली आहे. राज्य सरकार कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत असले, तरी सर्वाधिक गुंतवणूक खेचणाऱ्या महामुंबई (एमएमआरडीए) क्षेत्रातच सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मुंबई व पुणे परिसरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ; तसेच मुंबईतील लोकसंख्येच्या घनतेमुळे कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणणे हे सरकारपुढील मोठे आव्हान ठरेल, असे दिसत आहे. 

ही बातमी वाचली का? कोरोनाचा हाहाकार! मुंबईतील 381 ठिकाणे सील

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि दिल्ली या तीन राज्यांकडे सुरुवातीपासून कोरोना चिंतेचे प्रदेश, या दृष्टीने पाहिले जात होते. अन्य दोन राज्यांनी या स्थितीतून मार्ग काढण्यात यश मिळवले असताना महाराष्ट्रातील आकडेवारी मात्र चिंता वाढवणारीच ठरली आहे. आर्थिक घडी पुन्हा बसवण्यात महत्त्वाचे ठरतील, अशा भागांतच कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. महामुंबई आणि पुणे परिसर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची "शोकेस' मानली जात असल्यामुळे तेथील कोरोनाचा प्रादुर्भाव हा देशाच्या चिंतेचा विषय असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

ही बातमी वाचली का? आव्हाडांना धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा; राष्ट्रवादीची मागणी 

महाराष्ट्रात कोरोनावर अद्याप का नियंत्रण आले नाही, असा प्रश्‍न केंद्रीय आरोग्य खाते व इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च यांना पडला असल्याचे एका माहीतगाराने सांगितले. याबाबत केंद्र सरकारने राज्याशी सतत संपर्क ठेवला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कार्यालयाने शक्‍य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत, असे कळवल्याचे समजते. कोरोनाबाधितांमध्ये गुणाकार पद्धतीने वाढ झालेली नाही. जगाच्या तुलनेत महाराष्ट्रातील रुग्णांच्या वाढीचे प्रमाण कमी असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. 

ही बातमी वाचली का? मुंबईकरांना प्रवेशबंदी! रायगडच्या सागरी सीमा बंद

मुंबईत तीन-चार दिवसांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढेल. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या चाचण्या, हे त्याचे कारण आहे. मुंबईतून कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. दोन-तीन दिवसांनंतर आढळणारे रुग्ण सेकंडरी इन्फेक्‍शनचे असतील. 
- प्रवीणसिंह परदेशी, आयुक्त, मुंबई महापालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Concern about Maharashtra in the country; The situation has worsened due to Mahambhu, Pune