esakal | मुंबईकरांनो... शाब्बास!! अशा परिस्थितीतही तुम्ही करून दाखवलंत

बोलून बातमी शोधा

मुंबईकरांनो... शाब्बास!! अशा परिस्थितीतही तुम्ही करून दाखवलंत

कोरोनाच्या नकारात्मक वातावरणात दिलासा देणारी बातमी

मुंबईकरांनो... शाब्बास!! अशा परिस्थितीतही तुम्ही करून दाखवलंत
sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: शहरात आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही महिन्यात कोरोना रूग्णवाढीचा वेग प्रचंड होता. एकेकाळी दिवसाला तब्बल 10 हजारांहून अधिक नवे कोरोना रूग्ण सापडत होते. मुंबईतील वैद्यकीय व्यवस्थांवर प्रचंड ताण होताच, पण त्याशिवाय मुंबईकरांवरही भावनिकदृष्ट्या ताण होता. पण अशा परिस्थितीतही मुंबईमध्ये लागू असलेल्या कडक निर्बंधांमुळे आणि त्या निर्बंधांचे पालन केल्याने मुंबईत नव्या रुग्णांची संख्या स्थिरावल्याचे चित्र आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रुग्णवाढीचा दर हा एका टक्क्यापेक्षाही खाली आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 4 हजार 966 नवीन रुग्ण सापडले असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 6 लाख 40 हजार 507 इतका झाला आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 65 हजार 589वर आला आहे. रुग्णवाढीचा दरदेखील 1.09 वरून कमी होत 0.93 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे आता कोरोना हळूहळू नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे.

हेही वाचा: Phone Tapping Case: 'शक्य नाही..!!' रश्मी शुक्लांचे मुंबई पोलिसांना उत्तर

मुंबईत रुग्णवाढ नियंत्रणात आली असली तरी चिंतेची बाब म्हणजे मृतांचा आकडा अद्याप कमी झालेला नाही. सोमवारी देखील दिवसभरात 78 रुग्णांचा मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 12 हजार 990 वर पोहोचला आहे. आज मृत झालेल्यापैकी 40 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 51 पुरुष तर 27 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 6 रुग्णांचे वय 40 वयोगटाच्या खालील होते. 34 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 38 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते. मुंबईत कोरोना चाचण्यांवर भर देण्यात येत असून आतापर्यंत 53 लाख 41 हजार 625 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87 टक्के आहे. कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर 0.93 टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 74 दिवसांवर आला आहे. मुंबईत गुरुवारी 5 हजार 300 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 5 लाख 60 हजार 401 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 65 हजार 589 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

हेही वाचा: रेमडेसिव्हीरचा काळबाजार, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबईत 120 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 1 हजार 114 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासांत बाधित रुग्णांच्या संपर्कात 28 हजार 105 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 947 करण्यात आले.

धारावीतील रुग्णसंख्या नियंत्रणात

धारावीतील रुग्णसंख्यानियंत्रणात आली असून धारावीत आज 25 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 6 हजार 393 वर पोहोचली आहे. दादरमध्ये आज 50 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 8 हजार 765 झाली आहे. माहीम मध्ये 45 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 8 हजार 852 इतके रुग्ण झाले आहेत. मुंबईप्रमाणे जी उत्तर मधील रुग्णसंख्या देखील कमी झाली आहे. जी उत्तर मध्ये आज 120 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 24 हजार 10 झाली आहे.

(संपादन- विराज भागवत)