भाजपला सत्तेबाहेर ठेवा; सरकार स्थापनेला आघाडीच्या घटक पक्षांचाही पाठिंबा 

टीम ई-सकाळ
Friday, 22 November 2019

आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांशी आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यामागे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांचा काय हेतू आहे? याची माहिती घटक पक्षातील नेत्यांना या वेळी देण्यात आली.

मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली अंतिम टप्प्यात आल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचवेळी आघाडीतील घटकपक्षांना विश्वासात घेणे गरजेचं आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय होतं. आता आघाडीतील घटक पक्षांचाही या निर्णयाला पाठिंबा मिळाला असून, महाविकासआघाडीने सत्ता स्थापनेच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. 

बातम्यांसाठी डाऊनलोड करा सकाळचे एप

काय झाली चर्चा? 
आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांशी आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यामागे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांचा काय हेतू आहे? याची माहिती घटक पक्षातील नेत्यांना या वेळी देण्यात आली. तसेच या निर्णयावर घटक पक्षांची काय भूमिका आहे, हेदेखील जाणून घेण्यात आले. या चर्चेनंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या निर्णयाला पाठिंबा असल्याचे आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी स्पष्ट केले. त्यामुळं सत्ता स्थापनेसाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मीडियाला माहिती दिली. या बैठकीला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतच घटक पक्षांचे माजी खासदार राजू शेट्टी, जोगेंद्र कवाडे, अबू आझमी, मिनाक्षी पाटील आदी प्रमुख नेते उपस्थित होते. 

सत्ता स्थापनेचा दावा कधी?
सत्ता स्थापनेच्या मार्गातील अडथळे दूर होत असताना, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा कधी करणार? याची उत्सुकता लागली आहे. त्यावर जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेनेच्या चर्चेनंतरच सत्ता स्थापने संदर्भातील पुढचे पाऊल उचलणार, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. त्याचवेळी काँग्रेसचे दिल्लीतील काही ज्येष्ठ नेते आज, मुंबईतील बैठकीसाठी दाखल होत असल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी दिली.

उद्धव ठाकरेंनी आमदारांना दिली स्माईल

आता भाजप देतंय शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाची ऑफर

हे आहेत आघाडीतील प्रमुख घटक पक्ष

  • शेतकरी कामगार पक्ष 
  • स्वाभिमानी शेतकरी संघटना 
  • समाजवादी पार्टी 
  • बहुजन विकास आघाडी 
  • आयरपीआय कवाडे गट 
  • जनता दल सेक्युलर 
  • सीपीएम
  • सीपीआय 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress alliance parties ready to form government with shiv sena