Rahul Gandhi : आमची लढाई ‘शक्ती’विरोधात; राहुल गांधी यांनी फुंकले रणशिंग

मोदींची ५६ इंचाची छाती नाही, मोदी एक पोकळ व्यक्ती आहेत,’ अशी जोरदार टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली.
Rahul Gandhi
Rahul Gandhisakal

मुंबई - ‘आमची लढाई कोणत्या एका राजकीय पक्षाच्या किंवा एका व्यक्तीच्या विरोधात नाही. तर अशा एका शक्तीच्या विरोधात आहे जी ‘ईडी’, ‘सीबीआय’, प्राप्तिकर खात्याचा उपयोग गुंडांसारखा करते. हीच शक्ती मुंबई विमानतळ एकाकडून घेऊन दुसऱ्याच्या हातात एका रात्रीत सोपवते. या शक्तीच्या विरोधात आपल्याला लढा उभारायचा आहे.

मोदींची ५६ इंचाची छाती नाही, मोदी एक पोकळ व्यक्ती आहेत,’ अशी जोरदार टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली. नरेंद्र मोदी ‘ईव्हीएम’शिवाय निवडणुका जिंकूच शकत नाहीत असा थेट हल्ला चढवत नरेंद्र मोदींकडे भ्रष्टाचाराची मक्तेदारी असल्याचेही राहुल गांधी कडाडले.

शिवाजी पार्क मैदानात ‘इंडिया’ आघाडीची सभा पार पडली. सभेपूर्वी खासदार राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले. या सभेला इंडिया आघाडीतील १५ पक्षांचे नेते उपस्थित राहिले होते. भारत जोडो न्याय यात्रेचा शनिवारी धारावी येथे समारोप झाल्यानंतर आज इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.

राहुल गांधी यांनी मणीपूर ते मुंबई असा सहा हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला, त्यानिमित्ताने सर्व नेत्यांनी त्यांचे कौतुक केले. विद्वेष आणि हुकूमशाहीच्या विरोधातील राजकारणाच्या विरोधात एकजुटीने लढा देण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.

राहुल गांधी यांच्या आजच्या भाषणाला नेहमीपेक्षा जास्त धार आली होती. भाजपसोबत नरेंद्र मोदींवर थेट हल्ला करताना राहुल गांधी म्हणाले, ‘ईडी, सीबीआयची भीती दाखवून पक्ष फोडले जात आहेत. नरेंद्र मोदी ‘ईव्हीएम’शिवाय निवडणुका जिंकूच शकत नाहीत. ईव्हीएमबरोबर मतदान केल्यानंतर ‘व्हीव्हीपॅट’ स्लीप डब्यात पडते, त्याचीही मोजणी करा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली; परंतु निवडणूक आयोग मोजणी करण्यास नकार देत आहे.

मोदी फक्त जनतेची दिशाभूल करू शकतात. मला तुरुंगामध्ये टाकण्याची धमकी दिली, पण मी घाबरलो नाही. इंडिया आघाडीतील नेतेही घाबरत नाहीत. ही आघाडी देशाचे रक्षण करण्यासाठी एकत्र आली आहे. नरेंद्र मोदींकडे भ्रष्टाचाराची मक्तेदारी आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून खंडणी वसुली केली जात आहे.’

शिवाजी पार्कवरील सभेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती, काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रणिती शिंदे, आदी उपस्थित होते.

‘भाजपने पक्ष फोडले’

पक्ष सोडणारे सर्वजण घाबरून भाजपात गेल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला. यावेळी त्यांनी नुकतेच काँग्रेस सो़डून भाजपत गेलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा नामोल्लेख न करता सांगितले की, आमचे एक वरिष्ठ नेता काँग्रेस सोडून गेले. या शक्तीशी लढण्याची माझ्यात हिंमत नाही, मला तुरुंगात जायचे नाही हे त्यांनी माझ्या आईजवळ -सोनिया गांधींकडे रडून सांगितले. असे हजारो जण त्यांचे पक्ष केवळ या शक्तीला घाबरून सोडून गेले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेलेही घाबरूनच पक्ष सोडून गेले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

म्हणून यात्रा केली

राहुल गांधी म्हणाले, ‘देशातील मीडिया व सोशल मीडियासुद्धा सामन्यांच्या हातात नाही. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, महिलांचे प्रश्न आहेत; पण ते दाखवले जात नाहीत. त्यामुळेच मी कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणीपूर ते धारावी, मुंबई असा प्रवास केला.

माध्यमांमध्ये शेतकरी, कष्टकरी, अग्निवीर, बेरोजगार तरुण, महिलांचे प्रश्न ऐकून घेतले जात नाहीत. त्यामुळेच भारत जोडो यात्रा करण्याचा मी ठरवले. ही एकट्या राहुल गांधीची यात्रा नव्हती. तर माझ्यासोबत सर्व विरोधी पक्षाचे नेते, कार्यकर्तेसोबत चालले. ही सर्वांची यात्रा होती.’ सर्व महान व्यक्तींनी ‘नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान उघडा’, असा संदेश दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

नरेंद्र मोदींचे कार्यक्रम श्रीमंतांसाठी आहेत तर काँग्रेसचे कार्यक्रम गरीब समाजासाठी आहेत. मोदींना प्रचंड अहंकार आहे. २०१४ साली देश स्वतंत्र झाला अशी मोदींची धारणा आहे. नेहरू, आंबेडकर यांचे योगदान ते नाकारतात. राहुल गांधी यांनी ज्या शक्तीचा उल्लेख केला ती शक्ती आरएसएसची शक्ती आहे, मनुवादाची शक्ती आहे.

- मल्लिकार्जुन खर्गे, अध्यक्ष, काँग्रेस

राहुल गांधी म्हणाले

- चीनशी स्पर्धा करणे लघुउद्योग संपविले जात आहेत

- देशातील ७० कोटी लोकांकडे जितके धन आहे, तितके केवळ २२ जणांकडे आहे.

- दलित, मागासवर्गीयांना कोठेही संधी नाही

- नरेंद्र मोदींचे काम तुमची दिशाभूल करण्याचे आहे

- भारतात सध्या चाळीस वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी

- नरेंद्र मोदींजवळ भ्रष्टाचाराची मोनोपॉली

देशात मोदींची गॅरंटी चालणार नाही. याच मुंबईत महात्मा गांधीजींनी ‘छोडो भारत’चा नारा दिला होता, आता आपण सर्वांनी मिळून ‘छोडो भाजप’चा नारा द्यायला हवा.

- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

भाजप हा एक फुगा असून, या फुग्यात आम्हीच हवा भरली होती, याचे आम्हाला वाईट वाटते. आपली ही लढाई लोकशाही वाचविण्याची आहे. अब की बार, भाजप तडिपार.

- उद्धव ठाकरे, ठाकरे गटाचे प्रमुख

ज्या कंपन्यांचा नफा २०० कोटी रुपये आहे, त्यांनी १३०० कोटींचे निवडणूक रोखे कसे दिले? सरकारला याबद्दल प्रश्न विचारला पाहिजे. गृहमंत्री अमित शहा यांनी याचे उत्तर द्यावे.

- प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com