वाढीव वीजबिलाच्या तक्रारींबाबत ग्राहक अनभिज्ञ; न्याय मिळणार मोफत; ग्राहक तक्रार निवारण मंचाचे आवाहन 

तेजस वाघमारे
Monday, 12 October 2020

वीज कंपन्यांनी भरमसाय बिले पाठविल्याने ग्राहक चिंतेत असून, त्यांना सरकारकडून दिलासा मिळताना दिसत नाही. वीज कंपन्यांच्या कार्यालयात वारंवार धावाधाव केल्यानंतरही दिलासा मिळत नसल्याने ग्राहक संभ्रमात आहेत.

मुंबई : वीज कंपन्यांनी भरमसाय बिले पाठविल्याने ग्राहक चिंतेत असून, त्यांना सरकारकडून दिलासा मिळताना दिसत नाही. वीज कंपन्यांच्या कार्यालयात वारंवार धावाधाव केल्यानंतरही दिलासा मिळत नसल्याने ग्राहक संभ्रमात आहेत. याबाबत दाद मागायची कुठे, याबाबत ग्राहक अंधारात असल्याचे समोर आले आहे; मात्र आपल्या तक्रारींबाबत ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे ग्राहक दाद मागू शकतात. या ठिकाणी ग्राहकांना मोफत दाद मागता येणार आहे. 

दिवाळीनंतरही शाळा सुरू करणे अशक्‍यच; शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची माहिती - 

लॉकडाऊनच्या कालावधीत वीज ग्राहकांना भरमसाट वीजबिले पाठविण्यात आली. या बिलांमध्ये दिलासा मिळेल म्हणून वीज कंपन्यांच्या कार्यालयात ते फेऱ्या मारत आहेत; परंतु तक्रारींचे निरसन होत नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सरकारने घरगुती वीजग्राहकांना दिलासा देण्यासाठी पावले उचलली; परंतु हा निर्णय अद्यापही लालफितीमध्ये अडकला असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. यामुळे दाद कुठे मागायची, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. मात्र वीजबिलाबाबत ग्राहकांची गाऱ्हाणी सोडविण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागता येते. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती नसल्याने या मंचाकडे तक्रारी येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. बिलाबाबत कंपनीकडे दाद मागूनही समाधान न झाल्यास ग्राहकांना तक्रार निवारण कक्षाकडे दाद मागण्याचा पर्याय असल्याचा आदेश वीज नियामक आयोगाने दिला आहे. त्यानुसार ग्राहकांना आपल्या तक्रारींचे समाधान न झाल्यास मंचाकडे दाद मागता येणार आहे. 

आरे आंदोलनातील पर्यावरणवाद्यांचे गुन्हे मागे घेण्यात येणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती -

ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर सुमारे दोन महिन्यांत यावर सुनावणी घेऊन ग्राहकांना न्याय देण्यात येतो. यासाठी वकिलाची मदतही घेता येते किंवा स्वतः अर्जदार आपली बाजू येथे मांडू शकतो. यासाठी हस्तलिखित अर्जही ग्राह्य मानला जातो. उच्च न्यायालयानेही ग्राहकांना मंचाकडे दाद मागण्याचे निर्देश दिले आहेत; मात्र ग्राहकांमध्ये मंचाबाबत जनजागृती नसल्याने ग्राहकांच्या खूप कमी तक्रारी येत आहे. 
- संतोषकुमार जयस्वाल, अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण मंच (भांडुप) 

 

या ठिकाणी करता येणार तक्रार 
महावितरणच्या ग्राहक तक्रार निवारण मंचचे 18 विभाग आहेत. या ठिकाणी तक्रारदारांना विभागनिहाय मंचाकडे तक्रार अर्ज करता येतात. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ https://www.mahadiscom.in/mr/consumer-grievance-redressalapplication-for...

 

बेस्टच्या ग्राहकांसाठी तक्रारीचे ठिकाण 
तळमजला, बहुमजली अनेक्‍स इमारत, बेस्ट कुलाबा आगार, अकोमोडेशन मार्ग, कुलाबा. 
दूरध्वनी क्रमांक - 022 22856262 विस्तार क्रमांक 258 
ई-मेल आयडी - decgrf@cgrfbest.org.in 
decgrf@bestundertaking.com 

 

दर महिन्याला अडीच ते तीन हजार रुपयांच्या आसपास विजेचे बिल येते; परंतु लॉकडाऊनमध्ये आलेले बिल पाहून माझे डोळे पांढरे झाले. वीज कंपनीने दोन-तीन महिन्यांचे बिल बारा हजार रुपये पाठविले. आमच्या इमारतीतील रहिवाशांनादेखील या वीज कंपनीच्या भरमसाट बिलाचा मोठा फटका बसला आहे. सगळ्यांनी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली. त्यांनी सांगितले की आम्ही पूर्वीच्या बिलांचा अभ्यास करून हे बिल पाठविले असून, ते योग्य आहे. आता हे बिल थोड्या-थोड्या कालावधीत भरण्यास सांगितले आहे. आम्ही बिल तर भरणारच आहोत; परंतु त्यांनी दिलेल्या उत्तराचे किंवा आम्हाला जे काही सांगितले आहे, त्याने आमचे समाधान काही झालेले नाही. 
- पंकज विष्णू,
अभिनेता

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Consumers unaware of complaints of increased electricity bills Justice will be free