कोरोनामुळे भिवंडीचा 'असा' उठलाय बाजार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 मार्च 2020

भारताने चीनसोबत आयात-निर्यात बंद केली आहे. परिणामी, भारतात तयार होणाऱ्या कापडासह अनेक वस्तूंची मागणी वाढली आहे.

भिवंडी : चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे भारतासह जगातील इतर अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर कापडांची निर्यात करणारे वस्त्रोद्योगांसह अन्य व्यवसाय ठप्प झाले आहेत. चीनहून येणाऱ्या वस्तूही घेतल्या जात नाहीत. भारतातदेखील कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आल्याने देशात खळबळ माजली आहे. त्यामुळे भारताने चीनसोबत आयात-निर्यात बंद केली आहे. परिणामी, भारतात तयार होणाऱ्या कापडासह अनेक वस्तूंची मागणी वाढली आहे. त्यामुळे मंदीच्या छायेखाली असलेल्या भिवंडीतील यंत्रमागावर तयार होणाऱ्या कापड उद्योगाला चालना मिळाली आहे. कारखान्यातील खडखडाट पुन्हा जोमात सुरू झाल्याने कापडाचे उत्पादन जोमाने वाढू लागले आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

ही बातमी वाचा ः परदेशात वापरलेले मास्क भीवंडीत
देशात कापड उद्योगाची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहर परिसरातील कापड उद्योग नोटबंदी, जीएसटी तसेच वाढत्या वीज बिलामुळे संकटात आला होता. त्यातच चीनवरून स्वस्तात सूत व कापड आयात होत असल्यामुळे येथील कापडाची मागणी घटली होती. त्यामुळे कापड व्यावसायिक पूर्णतः खचून गेले होते. दरम्यान, चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे कापडांची निर्यात करणाऱ्या वस्त्रोद्योगांसह अन्य व्यवसाय गेल्या महिनाभरापासून ठप्प पडले आहेत. चीनहून येणाऱ्या वस्तूही घेतल्या जात नाहीत. त्यामुळे चीनचा कापड व्यापार ठप्प पडल्याने त्याचा फायदा येथील कापड उद्योगाला होत आहे. 

सध्या भिवंडीतील यंत्रमाग कारखान्यात तयार होणाऱ्या कपड्यांची मागणी वाढत असल्याने येथील यंत्रमाग कापड उद्योगांना सुगीचे दिवस येत आहेत, अशी प्रतिक्रिया कापड उद्योजक वसीम खान, जयंतीलाल भंडारी, अशोक जैन, हेमन मारू यांनी व्यक्त केली आहे. 

डाईंग कंपन्यादेखील तेजीत 
भिवंडी शहर परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात इंग्लिश, सोल्जर आणि जपानी स्वयंचलित यंत्रमागांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दररोज सुमारे तीन लाख मीटर कापड येथे तयार होते. सूती, कृत्रिम, पॉलिएस्टर आणि गणवेशात वापरल्या जाणाऱ्या फॅब्रिकचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जात आहे. भारताच्या महागड्या रंगामुळे कच्च्या कपड्यावर प्रक्रिया करण्यासाठी बहुतेक रंग चीनमधून आयात केला जात असे, पण चीनच्या रंगाऐवजी भारतीय रंगाची आता मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे कापडावर रंगाची प्रक्रिया करणाऱ्या डाईंग कंपन्यासुद्धा सध्या तेजीत आहेत. 

 Corona increased demand for textiles in Bhiwandi


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona increased demand for textiles in Bhiwandi