कोरोनाने मुंबईतली नोकरी गेली; चक्री वादळाने बंगालमधील घरही उद्धवस्त झाले

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 23 May 2020

कोरोना आणि चक्रीवादळ एकाचवेळी धडकल्याने अनेकांची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. मूळचे पश्चिम बंगालमधील असलेले, पण मुंबईत काम करणाऱ्यां अनेकांची अवस्था बिकट झाली आहे.

मुंबई : कोरोना आणि चक्रीवादळ एकाचवेळी धडकल्याने अनेकांची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. मूळचे पश्चिम बंगालमधील असलेले, पण मुंबईत काम करणाऱ्यां अनेकांची अवस्था बिकट झाली आहे. उत्तर प्रदेश, राजस्थानसाठी श्रमिक स्पेशल ट्रेन आहेत, पण पश्चिम बंगालसाठी या खूपच कमी ट्रेन रवाना झाल्यामुळे बंगालमधील अनेक जण मुंबईतच अडकलेले आहेत.

...म्हणून विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वारंटाईन नाही; उड्डानमंत्र्यांचा अजब निर्णय

चक्रीवादळ पश्चिम बंगालला धडकल्यानंतर काही तासांपासून मी घरच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे, पण अजून संपर्क होत नाही. का झाले ते कळत नाही. अनेक मित्रांशी संपर्क साधला, पण त्यांनाही काही माहिती नाही आणि मी मुंबईत अडकलो आहे, असे बंगालमधील अनेकांनी सांगितले. काहींनी आमचे कुटुंबिय सुरक्षित आहेत, पण घर गेले आहे. आता घरी जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. नोकरी नसल्यामुळे जवळच्या कोणाकडेही पैसे नाहीत, अशी खंतही व्यक्त होत आहे

दररोज हजार पंधराशे कोरोना रुग्ण वाढणाऱ्या मुंबईत 'मे' महिन्याच्या अखेरीस इतकी असेल रुग्णसंख्या...

पैसे कमावण्यासाठी काही महिन्यांपूर्वी मुंबईत आलो. आता नोकरी गेली आणि गावाकडचे घरही गेले. वादळामुळे गावाकडची आमची शैती वाहून गेली आहे. नोकरी नाही. मलाच काही खायला नाही, तर कुटुंबियांना काय पाठवणार अशी विचारणा झवेरी बाजारातील अनेक कर्मचाऱ्यांनी केली. येथील अडीच लाख कामगार पश्चिम बंगालमधील असल्याचे सांगण्यात येते. 
आमच्या मालकांनी पगार देता येत नाही. गावाला जायचा सल्ला दिला आहे, पण गावी जाणार कसे, जायला पैसे नाहीत. गावाकडचे घर तुटले आहे. आम्ही एकमेकांना मदत करुन खाण्याची सोय करीत आहोत, पण गावाकडे जायला कोणाकडेच पैसे नाहीत, असे सांगितले जाते. 

झवेरी बाजारमधील अनेक दुकानदारांनी आम्ही सुरुवातीस कामगारांना पैसे दिले. खायलाही दिले, पण आता आमचाही धंडा दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यांना गावाकडे परत जायला हवे यासाठी मदतही करीत आहोत. त्यातील अनेकांना नोंदणीसाठी मदत केली, पण जास्त ट्रेनच जात नाहीत. आम्ही काहींनी बसची व्यवस्था करुन देण्याचा प्रयत्न केला, पण तेही शक्य झाले नाही. 

 

पश्चिम बंगालला श्रमिक स्पेशल जाण्यास सुरुवात झाली, पण काही दिवसातच अम्फान चक्रीवादमुळामुळे ती थांबवण्याचा निर्णय झाला. परतीचे सर्व दरवाजे बंद झाले आहेत. काहीजण 8 ते 10 हजार खर्च करुन गावी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण ते निघताना आम्ही मुंबईत पुन्हा परतणार नाही असे खेदाने सांगतात. आता झवेरी बाजार कसा उभा राहणार हा प्रश्न आहे. अनेक कामगार दहा वर्षापासून काम करीत होते. मालकांचा त्यांच्यावर विश्वास होता. आता नवे कामगार आले तरी ते किती कुशल असतील तसेच त्यांच्यावर विश्वास किती असणार हा प्रश्न असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona lost her job in Mumbai; The cyclone also destroyed homes in Bengal