esakal | देवळे उघडल्याने भाविक आनंदले; मुंबईत पूजासाहित्य विक्रेतेही समाधानी | Temple open
sakal

बोलून बातमी शोधा

siddhivinayak mandir

देवळे उघडल्याने भाविक आनंदले; मुंबईत पूजासाहित्य विक्रेतेही समाधानी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनामुळे (corona) दीर्घकाळ बंद असलेली मंदिरे आजपासून उघडल्याने (temple opens) भाविकांनी सकाळपासूनच रांगा लावून आरती, दर्शन, पूजाविधींमध्ये आनंदाने (devotees happiness) सहभाग घेतला. अन्य धर्मीय प्रार्थनास्थळांमध्येही भाविकांनी आज गर्दी केली होती. दरम्यान, मंदिरांभोवतीचे फूल, पूजा साहित्य, प्रसाद, धार्मिक बाबी-पुस्तके विकणारे विक्रेतेही (Worship material sellers) भाविकांच्या या गर्दीने आनंदल्याचे दिसून आले.

हेही वाचा: अपना बँकेच्या नव्या योजनात महिलांना प्राधान्य

गेल्या वर्षीच्या मार्च-एप्रिलपासून सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे भाविकांसाठी बंद करण्यात आली होती. या वर्षी फेब्रुवारीत कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने पुन्हा मर्यादित काळासाठी ही प्रार्थनास्थळे उघडली; परंतु मार्चनंतर पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याने प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली होती. आजपासून घटस्थापनेच्या मुहूर्तावर ती उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार आरोग्यविषयक नियम पाळून आजपासून मंदिरांमध्ये भाविकांना प्रवेश देण्यात आला. भाविकांची प्रचंड गर्दी असलेल्या मोठ्या मंदिरांमध्ये आगाऊ ऑनलाईन वेळ घेऊनच भाविकांना प्रवेश देण्यात आला.

सर्वच लहान-मोठ्या मंदिरांमध्ये मास्क असलेल्या भाविकांना सॅनिटायझर लावून एकमेकांमध्ये अंतर ठेऊन प्रवेश दिला जात होता. अनेक ठिकाणी तर भाविकांचे तापमानही मोजले जात होते. तुरळक गर्दी असलेल्या मंदिरांमध्ये आरतीच्या वेळीही भाविक अंतर ठेऊनच उभे होते.

मुंबादेवी, सिद्धिविनायक, महालक्ष्मी येथे आगाऊ नोंदणी करूनच प्रवेश देण्यात आला. त्यामुळे तेथेही मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी प्रसाद-फुले नेण्यास परवानगी नसल्याने भाविक नाराज झाले; पण अनेकांनी नंतर प्रसाद खरेदी करून तो तसाच घरी नेला. महालक्ष्मी मंदिरात लांबूनच देवीला फुले दाखवून ती वेगळ्या टोपलीत ठेवली जात होती.

प्रशासनांचा गोंधळ

मंदिरे उघडण्याची परवानगी देताना सरकारने सांगितलेले नियम व नंतर महापालिका, पोलिस आदींनी घातलेले नियम यांच्यात थोडा फरक असल्याने मंदिर प्रशासनांचा गोंधळ झाला. काहींना ऐनवेळी ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी अॅप किंवा संकेतस्थळांमध्ये बदल करण्याची सोय करावी लागली. हे ध्यानात घेऊन महालक्ष्मी मंदिर प्रशासनाने भक्तांना आगाऊ वेळ घेण्यासाठी संकेतस्थळाबरोबरच दूरध्वनी क्रमांकाचाही (०२२-२३५३८९०१/२) पर्याय दिला.

नियमांबाबत साशंकता

सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे आज उघडली असली, तरी काही ठिकाणी गर्दी कमीच होती. नागरिकांमध्ये अजूनही नियमांबाबत सुस्पष्टता नाही. मंदिरांच्या निम्म्या क्षमतेनेच भाविकांना प्रवेश द्यावा, असे पालिकेने बजावले आहे; मात्र ही क्षमता कशी मोजावी, असाही प्रश्‍न ट्रस्टींसमोर आहे. अनेक मंदिरात फुले, प्रसाद आत नेण्यास मनाई असल्याने विक्रेत्यांचा निम्माच व्यवसाय झाला; तर काही ठिकाणी भाविकांकडून प्रसाद, धार्मिक साहित्य आदींची खरेदी सुरू झाल्याने मंदिरांभोवतीच्या या विक्रेत्यांमध्येही समाधानाचे वातावरण होते.

हेही वाचा: मुंबई : फ्लॅटच्या प्रलोभनाने फसवणाऱ्यास अटक


जैन मंदिरातही उत्साह
दादरच्या आत्मकलम लब्धीसुरीश्वरजी ज्ञानमंदिर ट्रस्टच्या जैनमंदिरात फार गर्दी नसली, तरी भक्तांचा उत्साह होता. एरवी दररोज अनेक भाविक फक्त कळसाचे दर्शन घेत होते. आता मंदिरात येण्याचा अवर्णनीय आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता. अजूनही बंधने असल्याने गर्दी कमी आहे; पण आता निदान आमचे अंबीलओळीचे जेवण, दिवाळीतील पूजा या गोष्टी तरी मंदिरात करता येतील, असे विश्वस्त प्रफुल्ल शहा यांनी सांगितले.

गुरुद्वारात उत्सव

सीबीडी बेलापूरच्या श्री गुरुसिंह सभा गुरुद्वारात आज शिखांचे पाचवे गुरू हरगोविंद जी यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी बंदी छोड दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित लंगर, कथाकीर्तन यात भाविक उत्साहाने सहभागी झाले. नेहमीइतकीच गर्दी आज होती, असे गुरुद्वारा ट्रस्टचे अध्यक्ष जसपालसिंह यांनी सांगितले.

"आजचा दिवस वगळता उद्यापासून मंदिरात फुले, नारळ, ओटी घेऊन जाण्यासाठी मनाई असल्याने घेतलेला माल असाच पडून राहणार आहे. त्यामुळे आम्हाला काय करावे, ते कळत नाही."
- राकेश पाटील, फूलविक्रेते, प्रभादेवी

"फुलांचे हार, ओटी मंदिरात नेण्यासाठी मनाई असल्याने व्यवसाय कमीच होणार आहे. त्यामुळे सरकारने, संबंधित मंदिर प्रशासनांनी यावर काही तरी तोडगा काढणे गरजेचे आहे."
- सुजाता भाटकर, फूलविक्रेते, प्रभादेवी

loading image
go to top