esakal | नवी मुंबईत डेंगीचे थैमान ; महापालिकेसहीत खासगी रुग्णालये भरली
sakal

बोलून बातमी शोधा

dengue

नवी मुंबईत डेंगीचे थैमान ; महापालिकेसहीत खासगी रुग्णालये भरली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : कोविड रुणांची (corona patients) संख्या कमी झाल्‍यावर आता नवी मुंबईकरांच्या डोक्यावर डेंगीसारख्या आजाराचे (Dengue decease) संकट उभे राहिले आहे. महापालिकेच्या २३ विविध नागरी आरोग्य केंद्र (Health centers) आणि रुग्णालयांत सुमारे २७९ डेंगी संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये (private hospitals) तब्बल ५०० पेक्षा जास्त डेंगीचे संशयित रुग्णांनी खाटा भरल्या (beds full) आहेत. शहरात सर्वच रुग्णालयांत डेंगीच्या रुग्णांची भर पडत असताना महापालिकेचे आरोग्य विभाग शहरात डेंगीची स्थिती आलबेल असल्याचे दाखवत आहे.

हेही वाचा: कॅबिनेटच्या निर्णयाला नवी मुंबई काँग्रेसचा विरोध

शहरातील बहुतांश रुग्णालयात दिवसाला किमान दोन डेंगीच्या रुग्णांची नोंद होत आहे; परंतु पुण्याची नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजीतर्फे (राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था) जोपर्यंत रुग्णांचे घेतलेल्या नमुन्यांना डेंगी म्हणून घोषित केले जात नाहीत, तोपर्यंत तो रुग्ण दगावल्यानंतरही प्रशासनाकडून डेंगीचा संशयित रुग्ण म्हणूनच घोषित केले जाते. याच आधारावर नवी मुंबई शहरात गेल्या जानेवारी महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत फक्त ८ डेंगीच्या रुग्णांची नोंद झाली आहे.

नवी मुंबई महापालिकेचे वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालय डेंगीच्या संशयित रुग्णांनी भरले आहे. गेल्या तीन दिवसांत रुग्णालयात डेंगीचे ६० संशयित उपचार घेत आहेत. ऐरोली आणि नेरूळ येथील रुग्णालय कोविडकरिता रूपांतर केल्याने या भागातील रुग्णांना खासगी रुग्णालयात भरती व्हावे लागत आहे.

सध्या महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रांमार्फत घरोघरी जाऊन हिवताप-मलेरिया सर्वेक्षण सुरू आहे; परंतु त्यामध्ये निष्पन्न होणारे रुग्ण नागरी आरोग्य केंद्रांतून बाह्यरुग्ण विभागामार्फत घरातच उपचार दिले जात आहेत. अशा रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्याला नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे तपासण्यासाठी पाठवले जात नाहीत. फक्त महापालिकेच्या रुग्णालयांत उपचार घेत असणाऱ्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने आम्‍ही पाठवत असल्‍याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा: गणेशोत्सवानंतर खवय्यांचा मांसाहाराकडे मोर्चा

माहिती देण्यास टाळाटाळ

नवी मुंबई शहरातील खासगी रुग्णालयांध्ये दिवसेंदिवस डेंगीच्या संशयित रुग्णांची भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व खासगी रुग्णालये व प्रयोगशाळांची माहिती घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत; परंतु त्या आदेशाला संबंधितांकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. बहुतांश खासगी रुग्णालयांमध्ये रोजच्या रोज भरती होणाऱ्या डेंगीच्या संशयित रुग्णांची माहिती महापालिकेला मिळत नाही. तसेच प्रयोगशाळेतही तपासणीनंतरही डेंगीच्या चाचण्यांची माहिती येत नसल्याची कबुली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील यांनी ‘सकाळ’ला दिली.

महापालिकेकडे प्लेट्सलेट्स नाहीत

महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयातील रक्तपेढीत डेंगीच्या रुग्णांना आवश्यक प्लेट्सलेट्स उपलब्ध नसल्‍याचे समजते. रुग्णांच्या गरजेनुसार, बाहेरून प्लेट्सलेट्स उपलब्ध करून दिल्‍या जात असल्याची माहिती येथील रक्‍तपेढी प्रमुख डॉ. प्रिती संघानी यांनी दिली. रक्तपेढीत रक्तापासून प्लेट्सलेट्स तयार करण्याची यंत्रणाही बंद आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू असून प्रत्यक्ष कार्यान्वित होण्यास दहा दिवस जातील, अशी माहिती संघानी यांनी दिली.

बाहेरील रुग्णांचा भरणा

नवी मुंबई शहरात डेंगीच्या संशयित रुग्णांमध्ये शहरातील रुग्णसंख्या २७९ इतकी आहे; परंतु पालिकेच्या आणि खाजगी रुग्णालयांत रायगड जिल्ह्यातून खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल आणि उरण भागातील रुग्ण येत आहेत. तसेच मुंबईतील गोवंडी, चिता कॅम्प, चेंबूर, मानखुर्दचे रुग्ण येतात. खासगी रुग्णालयांत नाशिक, सांगली, सातारा भागातील डेंगीचे संशयित रुग्ण येत आहेत.

"शहरात डेंगीचे रुग्‍ण वाढत असल्‍याची बाब गंभीर आहे. त्याकरिता आरोग्‍य विभागाला खासगी रुग्णालये व प्रयोगशाळांकडून माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गरज पडल्यास कोविडच्या कर्तव्यावर असणारे डॉक्टर व खाटा डेंगीच्या संशयित रुग्णांसाठी देण्यात येतील."

- अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.

loading image
go to top