esakal | Corona : दोन्ही डोस घेतलेल्यांचा कोरोनापासून 99 टक्के बचाव
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

Corona : दोन्ही डोस घेतलेल्यांचा कोरोनापासून 99 टक्के बचाव

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोना महामारीवर (Corona) उपाय म्हणून सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला सहा महिने पूर्ण झाले आहेत. या लसीकरण मोहिमेला(Corona Vaccination) मुंबईकरांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, पहिला डोस जवळपास 55 टक्के नागरिकांनी घेतला असून 15 टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. याचा अर्थ 15 टक्के नागरिकांनी हे दोन्ही डोस घेतल्यामुळे (Corona Dose) त्यांना आता कोविडपासून 99 टक्क्यांपर्यंत सुरक्षा मिळाली आहे. शिवाय, पहिला डोस घेतलेल्यांमध्ये ही अँटीबॉडीज(Antibodies) तयार होऊन जवळपास 97.5 टक्क्यांपर्यंत कोविडपासून सुरक्षा मिळ शकते असे पालिकेने (BMC) केलेल्या सर्व्हेक्षणात आढळले आहे. (Corona Vaccination Six month Completed ninety nine percent Safety people getting two dose-nss91)

पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार,  आतापर्यंत एकूण 65 लाख 24 हजार 841 लोकांना कोरोनाचा डोस मिळाला आहे. त्यापैकी 14 लाख 96 हजार 496 मुंबईकरांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर, 50 लाख 28 हजार 343 मुंबईकरांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. 15 लाखांपैकी 18 वर्षांवरील 70 हजार 055 नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर,45 वर्षांवरील 11  लाख 36 हजार 943 नागरिकांना आणि 60 वर्षांवरील 5 लाख 58 हजार 740 नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.

हेही वाचा: Offline Exam: पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख ठरली

या व्यतिरिक्त, 2 लाख 80 हजार 554 फ्रंट लाईन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की, कोरोनाविरूद्ध युद्ध लढणाऱ्या पहिल्या फळीतील फ्रंटलाईन वर्कर्स आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांपैकी 50 टक्के कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच मिळाले आहे. दरम्यान, तिसऱ्या लाटेपूर्वी किमान 70 टक्के लसीकरण करण्याचे पालिकेसमोर आवाहन असून लसींच्या अभावांमुळे हा टप्पा गाठणं कठीण होईल असे एकूणच परिस्थितीवरुन दिसत आहे.

16 जानेवारी या दिवशी सुरू झालेल्या या लसीकरणाच्या मोहमिअंतर्गत आतापर्यंत फक्त 15 लाख नागरिकांनी लसींचे दोन्ही डोस घेतले आहे. या लसीकरण मोहिमेत सर्वात मोठी अडचण ठरत आहे ती म्हणजे लस उपलब्ध न होण्याची. पालिकेने वारंवार मागणी करुनही लस उपलब्ध होत नसल्याने अधिकारीही हताश झाले आहेत. तिसर्‍या लाटेपूर्वी टास्क फोर्सने 70 टक्के मुंबईकरांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना केल्या होत्या. तिसरी लाट केव्हाही येऊ शकते. लसीकरणाची गती पाहून मुंबईकरांना 70 टक्के लोकांना तिसऱ्या लाटेपूर्वी कोरोनापासून सुरक्षा देण्याचे पालिकेला क्वचितच जमेल असे वाटते. अशा परिस्थितीत लसीकरण पूर्ण करणे आणि त्यासोबत तिसर्‍या लाटेचा सामना करणे हे मुंबईसमोर एक मोठे आव्हान आहे. नुकतंच पालिकेने गर्भवती महिलांचे लसीकरण सुरू केले आहे.

लस डोस

कोविशिल्ड - 6106235

कोव्हॅक्सिन- 410302

स्पुतनिक - 8304

सहा महिन्यांतील अडथळे

16 जानेवारी रोजी सुरू झालेल्या लसीकरणाच्या पहिल्या दिवशी 1,926 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला होता. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासूनच कोविन अॅपचा गोंधळ मुंबईकरांना सहन करावा लागला. कोविन अॅपच्या गोंधळाचा फटका बऱ्याच नागरिकांच्या दुसऱ्या डोसला बसला.

हेही वाचा: Admission: 'CET' वेबसाईट क्रॅश झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट!

कोविन अॅपच्या गोंधळामुळे झालेल्या नोंदी लोड न झाल्यामुळे दुसऱ्या डोससाठी जे संदेश जाणे अपेक्षित होते ते गेले नाहीत. ऑफलाइन पद्धतीने केलेल्या प्रक्रियेची नोंद अॅपने बऱ्याचदा स्वीकारलीच नाही. पहिल्या टप्प्यामध्ये सार्वजनिक, खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, अंगणवाडी सेविका यांचे लसीकरण करण्यात आले होते. खासगी रुग्णालयातील काही याद्यांमध्ये नावांची पुनरावृत्तीही झाली होती. तसेच काही जणांना संदेश गेले नाहीत. कोविन अॅपवर एकाच वेळी ताण येऊन नोंदी करण्यामध्ये अडचणी येणे, तांत्रिक बिघाड होणे, एका वेळी दोनदा संदेश जाणे, माहिती अपलोड न होणे, मध्येच अॅप बंद पडणे अशा विविध प्रकारच्या अडचणी येतात. आता हळूहळू ही परिस्थिती सुधारली असली तरी रजिस्ट्रेशन करण्यासाठी अनेक बुकिंग स्लॉट उपलब्ध होत नाही. त्यामुळे, पहिला डोस घेतल्यानंतर तीन महिने उलटून गेले तरी बऱ्याच नागरिकांचा दुसरा डोसही घेणे अजून बाकी आहे.

लस उपलब्ध न होणे

लसींच्या अपुर्या साठ्यामुळे मे महिन्यात नागरिकांना फक्त दुसरा डोस देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून लसीकरणावर अधिक मर्यादा आल्या. महापालिकेची रोज एक ते दीड लाख लसीकरण करण्याची क्षमता आहे. पण, लस उपलब्ध होत नसल्याने किमान 60 ते 70 हजारांचा टप्पा पालिका गाठत आहे. डोस उपलब्ध होत नसल्याने मुंबईतील लसीकरण महिन्याला किमान तीन वेळा बंद ठेवावे लागते.

गेल्या सहा महिन्यांत झालेले लसीकरण -

21 जानेवारी - 39,690

21 फेब्रुवारी - 1 लाख 81 हजार 621

(पहिला-दुसरा डोस)

21 मार्च - 9 लाख 33 हजार 033 (पहिला-दुसरा डोस)

21 एप्रिल - 12 लाख 08 हजार 997 (पहिला-दुसरा डोस)

21 मे - 8 लाख 27;हजार 923 (पहिला-दुसरा डोस)

21 जून - 21 लाख 59 हजार 692 (पहिला-दुसरा डोस)

19 जुलै - 10 लाख 87 हजार 893 ( पहिला-दुसरा डोस)

एकूण- 65 लाख 24 हजार 841

हेल्थकेअर - फ्रंटलाईन वर्कस एकूण

पहिला डोस 4,25,202 7,05,756

दुसरा डोस - 2,80,554

45 वर्षांवरील

पहिला डोस 23,59,810 34,96,735

दुसरा डोस - 11,36,943

18 ते 44 वर्षापर्यंत

पहिला डोस 22,34, 603 23,04,658

दुसरा डोस - 70,075

एकूण

पहिला डोस - 50,28,343

दुसरा डोस - 14,96,498 65, 24,841

हेही वाचा: देशमुखांनी CBI विरोधात केलेल्या याचिकेवर गुरुवारी निर्णय- HC

दोन्ही डोसमुळे 99 टक्क्यांपर्यंत सुरक्षा -

' ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण 50% टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. 55 टक्के नागरिकांनी पहिला डोस आणि 15% नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. 65 लाखांपेक्षा जास्त लोकांनी लास घेतलेली आहे. पहिला डोस घेतल्यावर त्यांचा शरीरात अँटीबॉडीज तयार व्हायला सुरुवात होते. त्याने ही कोरोना पासून बचाव होण्यास बरीचशी मदत होते.' 

सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

दुसऱ्या लाटेत केलेल्या सर्व्हेत लस घेतलेल्यांपैकी 2.66% लोकांनाच कोविड झाला होता. दोन्ही डोस घेतलेल्या लोकांपैकी 0.1 लोकांनाच कोविड झाला होता. पहिला डोस घेतल्यावर ही रोगाची लागण होत नाही असे स्पष्ट झाले होते. पालिकेने एका महिन्यापूर्वी हा अभ्यास केला होता. त्यात 4 लाख लोक बाधित झाले होते. त्या 4 लाखांपैकी फक्त 2.66% म्हणजेच 10600 लोक हे पहिला डोस घेतलेले होते आणि त्यातील 26 जणांना  लागण झाली होती त्यांचं प्रमाण 0.01 टक्के होतं. दोन्ही डोस घेतलेल्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी आहे. पण तरीही हात धुणे, मास्क लावणे आणि अंतर ठेवणे याचे पालन करणे बंधनकारक आहे. पहिला डोस घेतलेल्यांना 97.5% आणि दोन्ही डोस घेतलेल्यांना 99% सुरक्षा मिळते असे अहवालातून समोर आले आहे असेही काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.

loading image