कोरोना लसीच्या चाचणीला वेग, KEM मध्ये उद्या 3 स्वयंसेवकांना पहिली लस टोचणार 

भाग्यश्री भुवड
Friday, 25 September 2020

'ऑक्सफर्ड' विद्यापीठाच्या 'कोव्हिशील्ड' लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला आता वेग आला आहे.

मुंबई, 25 : अनेक अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर 'सीरम इन्स्टिट्यूट' आणि 'ऑक्सफर्ड' विद्यापीठाच्या 'कोव्हिशील्ड' लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला आता वेग आला आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयात बुधवारपासून या चाचणीला सुरुवात केली गेली. त्यानुसार, या इंजेक्शनचा पहिला डोस उद्या म्हणजेच शनिवारी 3 स्वयंसेवकांना दिला जाण्याची शक्यता आहे. शिवाय, आतापर्यंत एकूण 13 जणांचे स्क्रिनिंग पूर्ण झाले आहे. 

मंगळवारी एथिक कमिटीने केईएम रुग्णालयाला ऑक्सफोर्ड कोविशिल्डच्या क्लिनिकल ट्रायलला मान्यता दिली. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच बुधवारपासून स्वयंसेवकांचे स्क्रीनिंग सुरू करण्यात आले. गुरुवारी तीन स्वयंसेवकांचे स्क्रिनिंग केले गेले. हे तिन्ही स्वयंसेवक स्क्रिनिंग चाचणीत योग्य ठरल्याने शिवाय त्यांची  RT-PCR  आणि अँटीबॉडी चाचणी ही निगेटिव्ह आल्याने त्या तिघांना शनिवारी या लसीचा पहिला डोस दिला जाणार असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली आहे.

महत्त्वाची बातमी : राऊतांचा रोखठोक सवाल; मारुती कांबळेप्रमाणे आता सुशांत सिंह प्रकरणाचं काय झालं?

दरम्यान, आज म्हणजेच शुक्रवारीही 10 जणांचे स्क्रिनिंग करण्यात आले. अशाप्रकारे शुक्रवारपर्यंत एकूण 13 जणांचे स्क्रिनिंग पूर्ण झाले असून या 10 जणांचा अहवाल येणे अजून बाकी आहे. दरम्यान, शनिवारी आणखी 10 स्वयंसेवकांना स्क्रिनिंग साठी बोलावण्यात आले असल्याचे ही डॉ. देशमुख यांनी सांगितले आहे. 

एकूण 100 स्वयंसेवकांची या चाचणीसाठी निवड केली जाईल. त्यांचे स्क्रिनिंग करुन त्यांच्या चाचण्या केल्यानंतर चाचण्यांचा अहवाल आल्यानंतर त्यांच्या योग्यतेनुसार लसीचा डोस दिला जाणार आहे. टप्प्याटप्प्याने ही लस स्वयंसेवकांना दिली जाईल. 

गुरुवारी स्क्रिन केलेल्या तीन स्वयंसेवकांना शनिवारी पहिली लस टोचली जाणार आहे. हे तिघेही लस टोचण्यासाठी सुदृढ आणि योग्य असल्याकारणाने शिवाय, त्यांच्या चाचण्या ही निगेटिव्ह आल्याने त्यांना पहिली लस टोचली जाईल. पहिले दोन तास त्यांना निरीक्षणाखाली रुग्णालयातच थांबवले जाईल. पहिली लस टोचल्यानंतर तिघांवर काही विपरीत परिणाम होतात का, याचे निरीक्षण केले जाईल. त्यानंतर पुन्हा एका महिन्यानंतर त्यांना दुसऱ्यांदा लस टोचली जाईल. या लसीच्या योग्य अहवाल येण्यासाठी काही कालावधी जाईल. आतापर्यंत 13 जणांचे स्क्रिनिंग पूर्ण झाले आहे. शनिवारी आणखी 10 जणांची स्क्रिनिंग केली जाईल असं केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख म्हणालेत. 

महत्त्वाची बातमी : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचं ट्विट का डिलीट केलं ? स्वतः अजित पवारांनी सांगितलं कारण

कोव्हिशील्ड लसीची चाचणी काही दिवसांपूर्वी थांबवण्यात आली होती. त्यानंतर मुंबईतील केईएम रुग्णालयात ही क्लिनिकल ट्रायल होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, आता या मोहिमेला वेग आला असून लवकरच ही लस कोरोनासाठी उपलब्ध होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

( संपादन - सुमित बागुल ) 

corona vaccine testing in KEM hospital will start from saturday


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona vaccine testing in KEM hospital will start from saturday