आडनावामुळे गर्भवती महिलेला कोरोना; चुकीच्या अहवालामुळे नाहक मनस्ताप

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

  • ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या चुकीमुळे नऊ महिन्यांच्या गर्भवतीला मनःस्ताप सहन करावा लागला आहे. 
  • शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये कोरोनाची टेस्ट केल्यानंतर महिलेला 11 जूनला ती पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला.
  • मात्र नायर रुग्णालयात हा अहवाल चुकीचा असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान या धावपळीत या महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या चुकीमुळे नऊ महिन्यांच्या गर्भवतीला मनःस्ताप सहन करावा लागला आहे. शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये कोरोनाची टेस्ट केल्यानंतर महिलेला 11 जूनला ती पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला, मात्र नायर रुग्णालयात हा अहवाल चुकीचा असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान या धावपळीत या महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले आहे.

ही बातमी वाचली का? ब्रेकिंग: अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गळफास घेऊन आत्महत्या

महापालिका रूग्णालयाने अहवाल दिल्यानंतर गर्भवतीला सिव्हिल हॉस्पिटलमधील कोव्हिड कक्षात ठेवण्यात आले, मात्र सिव्हिल हॉस्पिटलने सीझर करावे लागणार असल्याने तिला नायर हॉस्पिटलला पाठवले. केवळ नायर हॉस्पिटलच नव्हे, तर अशा अवघडलेल्या परिस्थितीमध्ये एकट्या महिलेला चार हॉस्पिटल फिरावे लागले. नायर हॉस्पिटलमध्ये हा अहवाल या महिलेचा नसून केवळ आडनाव समान असल्याने चुकून हा अहवाल महिलेला देण्यात आला असल्याचे समोर आले. 

ही बातमी वाचली का? मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुरु केली नवी प्रणाली 

कशेळी परिसरातील 34 वर्षीय गर्भवतीला दिवस पूर्ण झाल्याने बाळकुंमच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते, मात्र कोव्हिडची टेस्ट करण्यासाठी तिला कळवा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. या हॉस्पिटलच्या चुकीच्या अहवालामुळे कळवा हॉस्पिटल ते सिव्हिल आणि नंतर नायर हॉस्पिटल असा प्रवास या महिलेला एकटीला करावा लागला. ठाण्यातीलच मंगेश जोशी यांना हा सर्व प्रकार समजल्यानंतर त्यांनी थेट मुंबईत नायर हॉस्पिटलला जाऊन या महिलेला आधार देत त्यांना पुन्हा ठाण्यात रुग्णवाहूकेतून आणले. त्यांनी सोशल मीडियावर हा सर्व प्रकार टाकल्यानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी कळवा हॉस्पिटलला जाऊन या महिलेला दाखल करून घेतले. यापूर्वी चुकीचा अहवाल देणाऱ्या खासगी लॅबवर पालिकेने कारवाई केली, आता पालिकेच्याच लॅबने चुकीचा रिपोर्ट दिल्याने संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.

ही बातमी वाचली का? मुंबईची लाईफलाईन पुढच्या आठवड्यात धावणार? सरकार घेणार मोठा निर्णय

     
पत्नी बाळकुंमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी कळवा हॉस्पिटलमध्ये कोरोनाची टेस्ट करायला सांगितले. 9 जूनला टेस्ट केल्यानंतर 11 जूनला अहवाल पॉझिटिव्ह असल्याचा आम्हाला फोन आला. त्यानंतर एक दिवस सिव्हिलच्या कोव्हिड कक्षात पत्नीला ठेवले. निगेटिव्ह असताना केवळ शिवाजी महााराज हॉस्पिटलच्या चुकीच्या अहवालामुळे पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. असे महिलेच्या पतीने सांगितले.

झालेला प्रकार अतिशय गंभीर आहे. आयुक्तांनी याची दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी. 
- नरेश म्हस्के, महापौर, ठाणे पालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona virus in pregnant woman due to misreporting hospital in thane