कल्याणमध्ये कोरोना पसरण्याचा धोका; कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल.... 

सुचिता करमरकर
Saturday, 11 July 2020

शहरातील टिळक चौक परिसरात असलेल्या वैद्य रुग्णालयाचे रुपांतर कोव्हिड स्पेशल रुग्णालय म्हणून करण्यात आले. मात्र, या खासगी रुग्णालयांकडून पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याने कल्याण परिसरात कोरोना पुन्हा एकदा पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

कल्याण :  कल्याण-डोंबिवली शहरामधील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने शहरातील विविध खासगी रुग्णालये पालिकेने ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहेत. कल्याण शहरातील टिळक चौक परिसरात असलेल्या वैद्य रुग्णालयाचे रुपांतर कोव्हिड स्पेशल रुग्णालय म्हणून करण्यात आले. मात्र, या खासगी रुग्णालयांकडून पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याने कल्याण परिसरात कोरोना पुन्हा एकदा पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामागील कारण जाणून घेतल्यास तुम्हालाही धक्का बसेल.

मनसेचे पुन्हा खळखट्याक;  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावरून संताप...​

टिळक चौकातील वैद्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचा वैद्यकीय कचरा रुग्णालय प्रशासनाकडून त्याच परिसरातील कचराकुंडीत टाकण्यात येत असल्याने स्थानिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या रुग्णालयामधील कचरा त्याच परिसरात असलेल्या कचराकुंडीत टाकला जात असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या कचऱ्यात रुग्णांसाठी वापरण्यात आलेल्या जेवणाच्या पत्रावळी तसेच ग्लोव्हज होते. अशाप्रकारे कोरोनाबाधितांनी वापरलेल्या गोष्टी उघड्यावर टाकल्या गेल्यास कोरोना पसरण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. 

शाब्बास! धारावीतील संसर्ग नियंत्रणात आणल्यामुळे WHO कडून कौतुकाची थाप

दरम्यान कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयाला पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असून त्यांना योग्य ती समज देण्यात आली आहे. तसेच यापुढे अशाप्रकारच्या कचऱ्याची योग्य रितीने विल्हेवाट लावण्याची समजही देण्यात आली आहे.

पुनःश्च लॉकडाऊन : १९ जुलैपर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये 'या' गोष्टी राहणार सुरु, 'या' राहणार बंद

पालिकेला यादीचा विसर
मुळातच दाट लोकवस्ती असलेल्या या परिसरात अशा रितीने कोव्हिड रुग्णालय सुरू केल्याने नागरिकांनी यापूर्वीच पालिका प्रशासनाला लेखी पत्र देऊन विरोध केला आहे. मात्र पालिका प्रशासनाने नियोजन केल्याप्रमाणे प्रत्येक प्रभागात असे रुग्णालय तयार करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांवर त्यांच्या घराजवळच्या परिसरात उपचार करणे शक्य होणार आहे. पालिका प्रशासनाने शहरातील अनेक खासगी रुग्णालये या कारणांसाठी ताब्यात घेतली आहेत. मात्र त्याबाबत सर्व समावेशक यादी अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी तसेच संभ्रमाचे वातावरण आहे.

कोरोनामुळे दंतवैद्यकांपुढे संकटांचा डोंगर; कठोर उपाययोजनांसह खर्चही वाढला....

खासगी रुग्णालयांनी कोरोनाबाधित रुग्णांमुळे तयार झालेला कचरा वैद्यकीय कचऱ्याबरोबरच पालिकेच्या गाडीत सुपूर्द करणे अपेक्षित आहे. या गोष्टीकडे दुर्लक्ष करणाऱ्या दहा रुग्णालयांवर यापूर्वीच कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी पालिका प्रशासन योग्य तो पाठपुरावा करेल.
- रामदास कोकरे, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, केडीएमसी

---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid hospital in kalyan throws medical waste in public dustbins