
फास्ट टॅगमुळे दहा तासात वाहनचोर गजाआड
भाईंदर : टोलनाक्यावरील टोल वसुलीसाठी जाणारा वेळ वाचविण्यासाठी सर्व वाहनांना फास्ट टॅग बसविण्याचे आदेश आहेत. अनेक वाहनांनी फास्ट टॅग बसवून घेतला असल्यामुले टोल नाक्यावर वेळेची बचत तर होतच आहे मात्र या फास्ट टॅगमुळे भाईंदर येथील चोरीला गेलेल्या डंपरचा अवघ्या दहा तासात शोध लावून चोराला ताब्यात घेणे पोलीसांना शक्य झाले आहे.
भाईंदर पश्चिम येथील अतुल ठाकूर यांचा सिद्धेश ट्रान्स्पोर्ट या नावाचा ट्रक-डंपरचा व्यवसाय आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी पहाटे चार वाजता ठाकूर यांना त्यांच्या मोबाईलवर बँकेकडून संदेश आला. एवढ्या सकाळी कोणता संदेश आला म्हणून ठाकूर यांनी संदेश तपासला असता त्यांच्या खात्यातून फास्ट टॅगद्वारे पैसे कट झाल्याचे संदेशात म्हतले होते. फास्ट टॅगचा उपयोग पडघा येथील अर्जुन अली टोलनाक्यावर झाल्याचेही त्यात नमूद करण्यात आले होते. ठाकूर यांना संशय आल्यामुळे त्यांनी तपासणी केली असता त्यांचा डंपर नाहीसा झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने भाईंदर पोलीस ठाणे गाठले. पोलीसांनी देखील त्वरित हालचाल केली.
पोलीसांनी सर्वप्रथम फास्ट टॅगबाबत आलेल्या संदेशावरुन डंपर चोर गाडी घेऊन नाशिकच्या दिशेने निघाला असल्याचा कयास केला. त्याच्या पुढचा टोलनाका घोटी याठिकाणी असल्यामुळे घोटी पोलीसांना डंपरची सर्व माहिती देण्यात आली आणि पोलीसांची एक गाडी घोटीच्या दिशेने रवाना केली. घोटी पोलीसांनी घोटी टोलनाक्यावरील कर्मचार्यांना सावध केले आणि घोटी टोलनाक्यावर डंपर येताच चोरासह डंपर ताब्यात घेतला. भाईंदर पोलीस देखील थोड्या वेळात घोटी येथे दाखल झाले आणि त्यांनी चोराला अटक केली. आधुनिक तंत्रद्न्यान आणि भाईंदर पोलीसांनी दाखवलेली सतर्कता यामुळे चोरीला गेलेला डंपर अवघ्या दहा तासात ताब्यात घेणे शक्य झाले आहे. अटक करण्यात आलेला चोर हा वाळू चोरांशी संबंधित असून चोरी केलेला डंपर अवैध रेती वाहतूकीसाठी वापरण्यात येणार असण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे.
Web Title: Crime Update Mumbai Vehicle Thief Arrested In Ten Hours Due Fast Tag
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..