थ्री इडियट सिनेमाप्रमाणे पोलिसांवर हायवोल्टेज हल्ला करून गुन्हेगार फरार

अनिश पाटील
Sunday, 22 November 2020

ट्रॉम्बे येथील चिताकँप परिसरात सराईत गुन्हेगाराने अटक टाळण्यासाठी दरवाजाच्या लॅचमध्ये हायवोल्टेज करंट सोडून पोलिसांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. घटनेनंतर आरोपीने पलायन केले आहे.

मुंबईः  सुपरहिट चित्रपट थ्री इडियटमध्ये रॅन्चोने ज्याप्रमाणे दरवाजाला इलेक्ट्रीक शॉक देऊन स्वतःचा रॅगिंगपासून बचाव केला होता. त्याचप्रमाणे ट्रॉम्बे येथील चिताकँप परिसरात सराईत गुन्हेगाराने अटक टाळण्यासाठी दरवाजाच्या लॅचमध्ये हायवोल्टेज करंट सोडून पोलिसांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. घटनेनंतर आरोपीने पलायन केले आहे. त्याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून विशेष पथक तयार करून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

अब्दुल करीम सदाबक्ष शेख ऊर्फ दुबई अक्रम(27) हा सराईत आरोपी असून त्याच्याविरोधात मारहाण, धमकावणे,चोरी, लूट असे 31 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीवर तडीपारीचीही कारवाई करण्यात आली आहे. असा हा सराईत दुबई अक्रम चिताकँप परिसरातील घरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. विविध गुन्ह्यांत वॉन्टेड असलेला आरोपी आपल्या परिसरात असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी विशेष पथक तयार केले. त्यानंतर अचानक घरी छापा टाकण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. पण कसेतरी याबाबतची माहिती दुबई अक्रमला मिळाली. त्याने अटक टाळण्यासाठी घराच्या दरवाज्याच्या लॅचमध्ये करंट सोडला. त्यावेळी अचानक घरात शिरण्याचा प्रयत्नात असलेल्या एका शिपायाने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. जसा त्याने लॅचला हात लावला, तसा त्याला विजेचा जोरदार झटका बसला. तो खाली कोसळल्यानंतर कसेतरी करून इतर पोलिस अक्रमच्या घरात शिरले. पण अक्रम आधीच तयारीत होता.

अधिक वाचा- कोरोना पॉझिटिव्ह एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्या, प्रीतम मुंडेंचं  परिवहन मंत्र्यांना पत्र

त्याने चॉपर तयारीत ठेवले होते आणि घरात शिरलेल्या पोलिसांवर फेकून त्याने चाकूने हल्ला केला. खूप प्रयत्न केल्यानंतर पोलिसांची संख्या अधिक असल्याचे लक्षात आल्यानंतर तो छतावर गेला. तेथे छोटी शीट बसवण्यात आली होती. ती उघडून त्याने तेथून पलायन केले. त्याच्याविरोधात भादंवि कलम 307(हत्येचा प्रयत्न), 353( सरकारी कामात अडथळा निर्माण करणे) तसेच भारतीय हत्यार बंदी कायदा कलम 4 आणि 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या अटकेसाठी ट्रॉम्बे पोलिसांनी विशेष पथक तयार करण्यात आले असून त्याचा शोध सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

अधिक वाचा-  उद्यापासून परीक्षा; ITIचे प्रशिक्षणार्थी, शिक्षक लोकल प्रवासाच्या प्रतिक्षेत

आरोपीविरोधात यापूर्वी तडीपारीची कारवाई करण्याबाबत विचार सुरू होता. ती प्रक्रिया आता जलदगतीने करण्यात येण्याची शक्यता आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असल्यामुळे त्याचे कुटुंबिय त्याच्यासोबत राहत नाहीत. काही महिन्यांपूर्वी त्याच्या भावाची हत्या झाली होती. वैयक्तिक वादातून ही हत्या झाली होती. तेव्हापासून अक्रम दुबई अधिकच आक्रमक झाला आहे.

------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Criminals flee by high voltage attack on police like in Three Idiots movie


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Criminals flee by high voltage attack on police like in Three Idiots movie