मेट्रोच्या कामाचा राडारोडा नाल्यात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 February 2020

पालिकेची मेट्रोला नोटीस; राडारोडा न हटवल्यास कारवाईचा इशारा 

मुंबई : मेट्रो 4 च्या बांधकामातून निघणारा राडारोडा जवळच्या सहार परिसरातील नाल्यामध्ये टाकला जात आहे. त्यामुळे नाल्यात अडथळा निर्माण होऊन पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून पालिकेने मेट्रो कॉर्पोरेशनला नोटीस बजावली आहे. नाल्यात टाकलेला राडारोडा त्वरित हटवा; अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे. 

मोठी बातमी दाऊदचा विश्वासू आणि कुख्यात गुंड तारीक परवीनला अटक

मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून मुंबईत मोठ्या प्रमाणात मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रो 4 प्रकल्पाअंतर्गत सहार मेट्रो रेल्वेस्थानकाचे बांधकामही अंतिम टप्प्यात आले आहे. जे. कुमार या बड्या ठेकेदाराकडून हे काम सुरू आहे. बांधकाम करताना त्यातून निघणारा राडारोडा या ठेकेदाराकडून सहार जवळील पी ऍण्ड टी नाल्यामध्ये टाकण्यात येत आहे. गेल्या वर्षभरापासून हे काम सुरू असून यामुळे नाल्याच्या प्रवाहात 3 फूट गाळ साचून अडथळा निर्माण झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पी ऍण्ड टी नाला या विभागातील महत्त्वाचा नाला असून सहार, मरोळ, कदमवाडी परिसरातील सांडपाणी याच नाल्यातून वाहून नेले जाते. हा नाला पुढे टी 2 टर्मिनलजवळ मिठी नदीला जाऊन मिळतो. त्यामुळे या नाल्यातील राडारोडा तसेच कचरा मोठ्या प्रमाणात मिठी नदीत जाण्याची शक्‍यता आहे. मेट्रोच्या ठेकेदाराचा हा हलगर्जीपणा लक्षात आल्यानंतर इथल्या राहिवाशांनी याविरोधात पालिकेच्या के पूर्व विभाग कार्यालयात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली.

हे सुद्धा वाचा संरक्षक कठड्यालाच कारची धडक

पालिकेच्या के पूर्व विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन पी ऍण्ड टी नाल्याची पाहणी केली. मेट्रोच्या ठेकेदाराकडून नाल्यात राडारोडा फेकला जात असल्याचे पाहणीत स्पष्ट झाले. त्यानंतर पालिकेच्या के पूर्व विभाग कार्यालयाने मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनलाला नोटीस पाठवली असून नाल्यातील राडारोडा तत्काळ काढून टाकण्यासाठी बजावले आहे. नाल्यातील राडारोडा तत्काळ साफ न झाल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. 

धक्कादायक पाचशे रुपयांसाठी केला ब्लेडने हल्ला

पी ऍण्ड टी कॉलनीसमोरील नाल्यात राडारोडा फेकण्याविरोधात मेट्रो कॉर्पोरेशनला नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना तत्काळ राडारोडा साफ करण्यास सांगण्यात आले आहे. नाला साफ न केल्यास पुढील कारवाईबाबत निर्णय घेण्यात येईल. 
- प्रशांत सपकाळे,
सहायक आयुक्त, के पूर्व विभाग 

मेट्रो प्राधिकरण आणि त्यांच्या ठेकेदारविरोधात पालिकेकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या आहेत. मेट्रो प्राधिकरणाकडून एक प्रकारे मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करण्यात येत आहे. पालिकेने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अन्यथा आम्हाला न्यायालयीन लढाईचा विचार करावा लागेल. 
- गॉडफ्राय पिंपेटा,
वॉचडॉग फाऊंडेशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The debris of the metro in works