निवडणुक येताच चौकाचौकात चमकोगिरी...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 February 2020

स्वच्छ शहर, सुंदर शहर अशी संकल्पना आकाराला येत असताना शहरातील राजकीय नेत्यांची छायाचित्रे असलेले असंख्य फलक शहरातील अनेक चौकाचौकांत झळकताना दिसत आहेत. 

नवी मुंबई :  राजकीय पक्षांच्या फलकबाजीवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सर्व महापालिकांना दिले आहेत; मात्र या आदेशाकडे नवी मुंबई महापालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. स्वच्छ शहर, सुंदर शहर अशी संकल्पना आकाराला येत असताना शहरातील राजकीय नेत्यांची छायाचित्रे असलेले असंख्य फलक शहरातील अनेक चौकाचौकांत झळकताना दिसत आहेत. 

ही बातमी वाचली का? मुंबई यंदाही तुंबणार

सध्या पालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे, त्यामुळे शहरात राजकीय जाहिरातबाजी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चौकाचौकांत राजकीय फलक दिसून येत आहेत. त्यात राजकीय सभा, प्रभागांतील नागरी कामे, हळदी-कुंकू, खेळांचे आयोजन आदी जाहिराती मोठ्या प्रमाणावर केल्या जात आहेत. यातील काही फलक पालिकेची रीतसर परवानगी घेऊन लावले जात आहेत; तर काही फलक विनापरवाना झळकत आहेत. त्यात ठाणे-बेलापूर मार्गावरील पादचारी पुलाला जाहिरात फलकांचा विळखा पडला आहे. पालिकेकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने बेकायदा जाहिरातबाजी करणाऱ्यांचे फावले आहे. निवडणुकीच्या धामधुमीचा माहोल सध्या शहरात तयार झाल्याने गल्लीतील साधा पक्षाचा किंवा सामाजिक कार्यकर्ता आपली प्रतिमा वाढवण्यासाठी आपल्या परिसरातील दर्शनी जागेत विनापरवाना फलक लावून आपले महत्त्व वाढवून घेत आहे.

ही बातमी वाचली का? रंगला असा पालखी सोहळा

सध्या शहरात फलक उभारण्याची स्पर्धाच लागली आहे. हे फलक लकवर काढण्यात येत नसल्याने धूळ-मातीने बरबटले आहेत. अशा शहर विद्रूपीकरणाच्या प्रक्रियेत गुंतलेल्या राजकारण्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश असतानाही पालिकेकडून याबाबत कठोर पावले उचलली जात नसल्याचे दिसून येत आहे. हा उच्च न्यायालयाचा अवमानच आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटू लागली आहे. याबाबत अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरीश पटनिगिरी यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. 

ही बातमी वाचली का? भावगीत गायक विनायक जोशी कालवश

महसूल बुडीत 
ठाणे-बेलापूर मार्गावरील पादचारी पुलावर विनापरवाना फलक उभारून जाहिरातबाजी करण्यात येत आहे. जाहिरात वा इतर कारणांसाठी फलक लावण्यासाठी पालिकेची परवानगी आवश्‍यक असते. त्यासाठी पालिकेने फलकाच्या आकारानुसार ठरवून दिलेली रक्कम भरावी लागते; परंतु विनापरवाना फलकबाजीमुळे पालिकेचा महसूल बुडत आहे; मात्र पालिकेला त्याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील पादचारी पूल अनधिकृत फेरीवाल्यांसाठी हक्काची बाजारपेठ ठरत असतानाच आता पादचारी पुलांवरदेखील राजकीय फलक झळकू लागले आहेत. 

शहरात विना परवाना जाहिरातीचे फलक लावण्यात आले असतील. तर ते संबधित विभागाला सांगून त्वरित काढले जातील. 
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, महापालिका. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demolition of the city due to banerbaji navi mumbai