धनंजय मुंडे प्रकरणात भाजपची गोची; आरोपांची धार कमी होणार?

dhananjay munde kirit somaiya devendra fadanvis chandrakant patil
dhananjay munde kirit somaiya devendra fadanvis chandrakant patil

मुंबई - गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कऱण्यात आलेल्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते किरिट सोमय्या, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अतुल भातखळकर या नेत्यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप गंभीर असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. दरम्यान, आता भाजप नेत्यानेच धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिल्याविरोधात तक्रार केल्यानं भाजपची गोची झाली आहे. 

भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेविरोधात आंबोली पोलिसात तक्रार केली आहे. संबंधित महिला मलाही फसवण्यासाठी प्रय़त्न करत होती असा आरोप त्यांनी केला आहे. जेव्हा महिलेची अधिक माहिती घेतली असता ती फसवणूक करत असल्याचं समजल्यानंतर मी संपर्क कमी केला असं त्यांनी एका टीव्ही चॅनेलशी बोलताना सांगितलं. हेगडे यांच्या यांनी असा खुलासा केल्यामुळे आता भाजप नेत्यांची पंचाईत होऊ शकते. 

भाजप नेत्यांनी काय म्हटलं?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरून धनंजय मुंडेंवर टीका करताना म्हटलं होतं की, मुख्यमंत्री बंगले लपवतात तर त्यांचे मंत्री बायको लवपतात. तीन महिलांचे संबंध असलेल्या मंत्र्याने आता परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत राज्याच्या मंत्रीमंडळातून बाहेर रहावं असंही त्यांनी म्हटलं होतं.  याशिवाय अतुल भातखळकर यांनी म्हटलं की, धनंजय मुंडेंनी त्यांच्या अपत्यांची माहिती लपवली, त्यामुळे मुंडेंची आमदारकी रद्द करण्यात यावी असं पत्र निवडणूक आयोगाला लिहिलं आहे. ठारके सरकारमध्ये अशाच नमुन्यांचा भरणा केल्याचं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका केली होती. 

धनंजय मुंडे यांनी याप्रकरणानंतर आता राजीनामाच द्यावा अशी मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे. त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही अशीच मागणी करताना ट्विटरवर म्हटलं की, ज्या व्यक्तीवर अशा प्रकारचे आरोप होतात त्याला पदावर राहण्याच नैतिक अधिकार नाही. महाविकास आघाडीचे सरकार आत्मपरीक्षण करून मुंडेंचा राजीनामा घेईल असं वाटत नाही. पण तरीही मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी आमची जोरदार मागणी असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. दुसरीकडे भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नाही तर रस्त्यावर उतरू अशा इशारा दिला होता.

महाविकास आघाडीचे नेते काय म्हणतात?
भाजप नेत्यांकडून राजीनाम्याची मागणी केली जात असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र यावर सावध अशीच भूमिका आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, धनंजय मुंडेचां तो वैयक्तिक प्रश्न आहे. तसंच हा मुद्दा राजकारणाचा नसून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याबाबत योग्य तो निर्णय़ घेतील असंही राऊत यांनी सांगितलं होतं. 

धनजंय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची शहानिशा केल्याशिवाय निष्कर्ष काढणं योग्य नाही. आम्ही यामध्ये काहीच हस्तक्षेप करणार नाही असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना याप्रकरणाची सविस्तर माहिती दिली होती. यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर असे आहेत. यासाठी आम्हाला पक्ष म्हणून काहीतरी निर्णय़ घ्यावा लागेल. पक्षच्या प्रमुख सहकाऱ्यांशी बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com