धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेविरुद्ध भाजप नेत्याचीही तक्रार; खळबळजनक खुलासा

टीम ई-सकाळ
Thursday, 14 January 2021

भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी आता खळबळजनक खुलासा केला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेनं आपल्यालाही फसवण्याचा प्रयत्न केला होता असं त्यांनी म्हटलं आहे.

मुंबई Mumbai News : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे Dhananjay munde यांच्यावर अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर महाराष्ट्रात गेले दोन दिवस खळबळ उडाली आहे. राजकीय क्षेत्रात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. त्यात भाजप नेत्यांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. पण, आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. कारण, मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिले विरोधात आता एका भाजप नेत्याने तक्रार दाखल केलीय. त्यामुळं मुंडे यांच्या प्रमाणेच आणखी व्यक्तींना त्या महिलेने ब्लॅकमेल केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आणखी वाचा - धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर : शरद पवार

आज दुपारी भाजप नेते कृष्ण हेगडे Krishna Hegde मुंबईतील आंबोली पोलिस ठाण्यात दाखल झाले. हेगडे यांनी यापूर्वीच संबंधित महिलेविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्याचे एफआयआरमध्ये रुपांतर करण्यासाठी हेगडे पोलिस ठाण्यात गेले आहेत. मुंडे यांच्या विरोधात तक्रार केलेल्याच महिलेने आपल्यालाही ब्लॅकमेल केल्याची माहिती हेगडे यांनी न्यूज चॅनेलला दिली आहे. संबंधित महिलेने 2010पासून आपल्यालाही एसएमएसद्वारे आणि फोन करून धमक्या दिल्या होत्या. पैसे उकळण्याचा प्रयत्न केला होता. मी त्या महिलेला सातत्याने टाळलं होतं, असंही हेगडे यांनी स्प्ट केलंय.

आणखी वाचा - धनंजय मुंडे प्रकरणावर जयंत पाटील यांची भूमिका काय?

काय म्हणाले कृष्णा हेगडे?
भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी आता खळबळजनक खुलासा केला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेनं आपल्यालाही फसवण्याचा प्रयत्न केला होता असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, मी माहिती घेतल्यानं वाचलो असंही ते म्हणाले. जेव्हा संबंधित महिला फसवणूक करते असं समजताच तिला टाळलं. तिच्या म्युझिकच्या व्हिडिओसाठी पैसे हवे होते तेव्हा सातत्याने मला त्रास देत होती. माझ्याशी संपर्क का ठेवत नाही असंही ती विचारत होती. पण तरीही तिला दूरच ठेवलं असं हेगडे यांनी सांगितलं. हेगडे म्हणाले की, जेव्हा मी तिच्याशी संपर्क कमी केला तेव्हा तिने मेसेज केला होता की , रेणू फ्रॉम अंधेरी, आप मुझे भूल गये क्या? यानंतर आता धनंजय मुंडे यांचे प्रकरण समोर आलं आहे. संबंधित महिलेसारखी लोकं इतरही लोकांना ब्लॅकमेल करतात. आज धनंजय मुंडे आहेत. मी सावध झालो नसतो तर याजागी मी असतो असे कृष्णा हेगडे म्हणाले.

आणखी वाचा - तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली

'धनंजय मुंडे मित्र नाहीत'
सध्या कृष्णा हेगडे हे आंबोली पोलिसात तक्रार देण्यासाठी आले आहेत. त्याआधी आपण पोलिसांना कल्पना दिली आहे आणि माध्यमांनाही माहिती दिल्याचं हेगडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. धनंजय मुंडे हे माझे मित्र नाहीत मात्र पण त्यांना टार्गेट केलं जात होतं. उद्या कदाचित मलाही टार्गेट केलं जाऊ शकतं असाही दावा हेगडे यांनी केला. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही. माझा वैयक्तिक प्रॉब्लेम असून तो मी पुढे आणत आहे. 2010 पासून टार्गेट केलं. यामध्ये माझं काही कनेक्शन नाही. ती मलाही त्रास देत होती आणि फसवणूक करण्याचा प्रयत्न करत होती. आणखी लोकंही पुढं येतील असा विश्वास हेगडे यांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhananjay munde bjp leader krishna hegde complaint against woman