esakal | धारावी झाली कोरोनामुक्त; महापौरांनी दिली कौतुकाची थाप
sakal

बोलून बातमी शोधा

Dharavi in Mumbai

धारावी झाली कोरोनामुक्त; महापौरांनी दिली कौतुकाची थाप

sakal_logo
By
विराज भागवत

दुसऱ्या लाटेत प्रथमच धारावीमध्ये एकही अ‍ॅक्टिव्ह रूग्ण नाही

मुंबई: राज्यासह मुंबईत (Mumbai) आता हळूहळू कोरोनाची (Corona) रूग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मुंबईतील दाटीवाटीची वस्ती असलेल्या धारावीमध्ये (Dharavi) कोरोना शिरला तर तेथे हाहा:कार माजेल असा अंदाज तज्ज्ञांनी कोरोनाच्या सुरूवातीला व्यक्त केला होता. पण पहिल्या लाटेच्या वेळी धारावीकरांनी शिस्त पाळली आणि कोरोनावर मात (Corona free) केली. पहिल्या लाटेत तब्बल सात वेळा धारावीमध्ये एकही रूग्ण (No Active Cases) न आढळण्याची घटना घडली होती. दुसऱ्या लाटेतही (Second Wave) धारावीमध्ये काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात रूग्ण सापडत होते. पण, दुसऱ्या लाटेत आज पहिल्यांदाच धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा शून्यावर गेला. या मुद्द्यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी धारावीकरांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. (Dharavi becomes Corona Free as No Active Cases in slum area Mayor Kishori Pednekar congratulates)

हेही वाचा: मुंबई लोकलबाबत वडेट्टीवारांचं महत्वाचं वक्तव्य, म्हणाले...

"धारावीचा परिसर हा खूप दाटीवाटीचा आहे. धारावीमध्ये आधी साफसफाईबद्दल काही अंशी उदासीनता दिसून यायची. पण नंतर कोरोनाच्या पहिल्या लाटेत धारावीकरांनी योग्य ती खबरदारी घेतली आणि पालिकेने घालून दिलेले नियम पाळले. त्यामुळे पहिल्या लाटेतून धारावीकर सुखरूप बाहेर आले. दुसऱ्या लाटेमध्ये धारावीत खूपच चिंताजनक स्थिती निर्माण झाली होती. सामान्य माणसाला राहण्यासाठी प्रति स्केअर फूट जितकी जागा लागते त्यापेक्षाही कमी जागेत धारावीतील लोक राहतात. अशा परिस्थितीतही अतिशय गजबज असलेल्या धारावीत दुसऱ्या लाटेत आज पहिल्यांदाच शून्य रूग्ण आढळले. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हे वाक्य नीट आचरणात आणलं आणि पालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य केलं तर धारावीसारखा दाटीवाटीचा परिसरही कोरोनामुक्त होऊ शकतो हे आज सिद्ध झाले. या प्रयत्नांसाठी धारावीकरांचे आभार आणि अभिनंदन", अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी धारावीकरांचे कौतुक केले.

हेही वाचा: "औरंगजेबाला बंद न पाडता आलेली वारी ठाकरे सरकारने बंद पाडली"

"दाटीवाटीच्या वस्तीत राहून पण धारावीमध्ये शून्य रूग्णसंख्या आणण्यात यश आले. तब्बल 7 वेळा धारावीकरांनी हे करून दाखवलं. तेथील वॉर्ड ऑफिसर किरण दिघावकर हे तरूण आणि तडफदार अधिकारी आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली त्यांच्या टीमने उत्तम काम केले. त्यांनी योग्य प्रकारे नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला. त्यामुळेच हे शक्य झालं. आता यात सातत्य टिकवून ठेवण खूप गरजेचं आहे. हा त्रिसूत्री कार्यक्रम आहे. तो पाळला गेला पाहिजे. गर्दीत न जाता काळजी घेतली पाहिजे", अशा सूचना त्यांनी दिल्या.

loading image