ठाणे पालिकेच्या आरोग्य सेवेचा बोजवारा! रुग्णवाहिका कर्मचारी, आशा स्वयंसेविकांचे वेतन 5 महिने रखडले

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 9 मे 2020

कोरोनाच्या महामारीमध्ये प्रत्येक आरोग्यसेवक जीवावर उदार होऊन काम करीत आहे. मात्र, या आरोग्य सेवकांना त्यांचा मेहनतानाच ठाणे महापालिकेकडून देण्यात आलेले नाही.

ठाणे :  कोरोनाच्या महामारीमध्ये प्रत्येक आरोग्यसेवक जीवावर उदार होऊन काम करीत आहे. मात्र, या आरोग्य सेवकांना त्यांचा मेहनतानाच ठाणे महापालिकेकडून देण्यात आलेले नाही. त्यामध्ये कार्डीयाक रुग्णवाहिका चालवणारे चालक आणि आशा स्वयंसेविकांचाही समावेश असल्याची बाब ज्येष्ठ नगरसेवक मिलींद पाटील यांनी उघडकीस आणली आहे. विशेष म्हणजे, पाटील यांनी पालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकार्‍यांना ही बाब कळवूनही या कर्मचार्‍यांना वेतन आणि मानधन देण्यात आलेले नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

पालघर हत्याकांड ! सीबीआयकडे तपास सोपवण्याची भाजप नेत्याची मागणी

कोरोना महामारीला सुरुवात झाल्यापासून ठाणे महानगर पालिकेच्या आरोग्य सेवेत असलेले कर्मचारी रात्रीचा दिवस करून आपली सेवा बजावत आहेत. त्यामध्ये पालिकेच्या सेवेत असलेल्या कार्डीयाक रुग्णवाहिका चालकांचाही समावेश आहे. पालिकेच्या सेवेते कार्डीयाक रुग्णवाहिका चालविणारे 26 चालक आहेत. त्यांना गेल्या पाच महिन्यांपासून वेतनच देण्यात आलेले नाही. तर, सुमारे 200 पेक्षा अधिक आशा स्वयंसेविका या कोरोनाबाधित क्षेत्रामध्ये सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. त्यांना अवघे 1500 रुपयांचे मानधन देण्यात येते. मात्र, हे अनुदानही जानेवारी महिन्यापासून देण्यात आलेले नाही.

त्यामुळे या कुटुंबियांची उपासमार होत आहे. ही बाब आपण पालिका आयुक्तांना फोनद्वारे कळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी फोन न घेतल्याने मेसेज करून चालक आणि आशा स्वयंसेवकांच्या रखडलेल्या वेतनाची माहिती दिली आहे. तसेच, मुख्य आरोग्य अधिकारी डाॅ. माळगावकर यांनाही ही बाब सांगितली, मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची दखलच घेतलेली नाही, असेही मिलींद पाटील यांनी सांगितले.

कंत्राटी अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर एसटीचा कारभार; ST महामंडळाला नियमीत MD कधी मिळणार?

अधिकाऱ्यांना घरी बसवा
ठाणे पालिकेचा हलगर्जीपणा डायलेसीसच्या रुग्णांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या अनेक रुग्णालये कोव्हिड -19 साठी अधिग्रहीत करण्यात आलेली आहेत. त्यामुळे डायलेसीससाठी रुग्णांना धावपळ करावी लागते. विशेष म्हणजे, पालिकेच्या वाडिया रुग्णालयात डायलेसीसची संपूर्ण यंत्रणा 10 महिन्यांपासून उभी आहे. मात्र, उद् घाटन न झाल्याने तिचा वापरच करण्यात येत नाही; ही बाबही संबंधितांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही कारवाई होत नसल्याने अशा अधिकार्‍यांना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात मिलींद पाटील यांनी संताप व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disruption of Thane Municipal Corporation's health service! Ambulance staff, Asha workers salary stagnated for 5 months