esakal | लोकल वेळेचे गणित जुळेना, महिलांचा पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद 
sakal

बोलून बातमी शोधा

लोकल वेळेचे गणित जुळेना, महिलांचा पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद 

सर्वसामान्य महिला प्रवाशांना बुधवारपासून लोकलने प्रवास करण्यास रेल्वे प्रशासनाने परवानगी दिली. त्यानुसार प्रशासनाने आज रेल्वेस्थानकांवर सज्जताही ठेवली; परंतु डोंबिवलीत पहिल्याच दिवशी बहुसंख्य महिला प्रवाशांनी लोकल प्रवासास दांडी मारल्याचे दिसून आले. सर्वसामान्य महिलांना सकाळी 11 नंतर प्रवासाची मुभा दिली, मात्र ही वेळ नोकरदार वर्गाची नाही. कार्यालयातून उशिरा येण्याची परवानगी मिळाल्यास लोकलने प्रवास करू, तोपर्यंत नाही, असे सांगून महिला प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

लोकल वेळेचे गणित जुळेना, महिलांचा पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद 

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

ठाणे : सर्वसामान्य महिला प्रवाशांना बुधवारपासून लोकलने प्रवास करण्यास रेल्वे प्रशासनाने परवानगी दिली. त्यानुसार प्रशासनाने आज रेल्वेस्थानकांवर सज्जताही ठेवली; परंतु डोंबिवलीत पहिल्याच दिवशी बहुसंख्य महिला प्रवाशांनी लोकल प्रवासास दांडी मारल्याचे दिसून आले. सर्वसामान्य महिलांना सकाळी 11 नंतर प्रवासाची मुभा दिली, मात्र ही वेळ नोकरदार वर्गाची नाही. कार्यालयातून उशिरा येण्याची परवानगी मिळाल्यास लोकलने प्रवास करू, तोपर्यंत नाही, असे सांगून महिला प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. डोंबिवली रेल्वेस्थानकात सकाळी अकराला महिलांची तिकीट खिडक्‍यांसमोर गर्दी झाली; परंतु त्यानंतर स्थानकात शुकशुकाट पाहायला मिळाला. 

क्लिक करा : कल्याणच्या जलवाहतुकीवर फेरले 'पाणी'; खर्चात कपात करण्यासाठी प्रकल्पातून वगळले

महिलांना लोकल प्रवासासाठी सकाळी 11 ते दुपारी 3 ही वेळ ठरवून देण्यात आल्याने सुरुवातीपासूनच नाराजी होती. तरीही बुधवारी सकाळी महिलांची स्थानकात गर्दी होईल या अनुषंगाने सकाळी 7 वाजल्यापासून रेल्वेस्थानकात मोठा पोलिस बंदोबस्त पाहावयास मिळाला. अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र तपासले जात होते. तिकीट काढून प्रवास करावयाचा असल्याने नोकरदार महिलांनी सकाळी 10.30 ला डोंबिवली स्थानक गाठले; परंतु त्यांना स्थानकात प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे महिलांनी स्थानकाच्या बाहेरील रस्त्यावर मोठी रांग लावली. 11 वाजता महिलांना स्थानकात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर तिकीट खिडक्‍यांवर महिलांचा गोंधळ उडाला. 

महिला प्रवासी पासची मागणी करीत होते; परंतु त्यांना फक्त तिकीटच देण्यात येत असल्याने तिकीट कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी गर्दीमध्ये कुठेही शारीरिक अंतराचे पालन केले गेले नाही. पोलिस कर्मचारीही महिलांची गर्दी कमी झाल्यानंतर उर्वरित महिलांना शारीरिक अंतराचे पालन करा, अशा सूचना देताना दिसून आले. रेल्वेने ठरवून दिलेली वेळ गैरसोयीची असून, त्याचा नोकरदार महिलांना काहीच फायदा नाही, अशी ओरड अनेक महिलांनी केली. 

अधिक वाचा : कांद्याने केला वांदा आणि ताटातली भाजी महागली; गृहिणींच्या बजेटवरही मोठा परिणाम

दसऱ्यापर्यंत महिला घरीच 
नवरात्रीचे उपवास तसेच घरून काम करण्याची सवलत असल्याने अनेक महिलांनी दसरा होईपर्यंत घरूनच काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महिला नोकरदारांची गर्दी पहिल्या दिवशी कमी पाहायला मिळाली. याबाबत श्रावणी पिलणकर या म्हणाल्या, लोकलची वेळ ही 11 ची आहे. आम्ही कार्यालयात कळवू, त्यानंतर मालकाने आम्हाला उशिरा येण्याची मुभा दिली तरच आम्ही प्रवास करू शकतो. नाही तर लोकल सुरू होऊनही काही फायद्याची नाही. 

मी कल्याणला कामानिमित्त दररोज जाते. ओलाने माझे एका वेळेचे 200 रुपये जातात. लोकल प्रवासासाठी पास काढण्यास गेले; परंतु पास चालणार नाही, तुम्हाला तिकीटच काढावे लागेल, असे सांगण्यात आले. तिकिटासाठी दररोज मोठी रांग लागते. त्यामुळे लोकल सुरू केली तरी प्रवाशांची गैरसोय कायम आहे. 
- गौरी बागणे, प्रवासी. 

अंधेरी येथे मी नोकरीनिमित्त जाते. गेले सहा महिने मी घरात आहे. मार्च महिन्यात मी पास काढला होता, हा पास रिन्यूव्ह करून मिळेल, असे रेल्वेतर्फे सांगण्यात आले. पास रिन्यूव्ह करायला गेल्यास आम्हाला सीएसएमटीला तक्रार करा, असे सांगितले जाते. 
- मंगल हंकारे, प्रवासी. 

--------------------------
(संपादन : प्रणीत पवार)

loading image