बंटी-बबलीकडून दिवावासीयांची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

भामट्या दुकलीने दिवावासीयांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.

ठाणे - खासगी गुंतवणूक कंपनीत मासिक आवर्ती ठेव योजनेत (रिकरिंग डिपॉझिट) रक्कम गुंतवल्यास बक्कळ व्याज मिळेल, असे प्रलोभन दाखवून भामट्या दुकलीने दिवावासीयांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. दोन्ही आरोपींविरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - समोरच्याला समजू न देता वाचा व्हाटसअपवरचे मेसेज

या भामट्या दुकलीचे नाव रोहित कांबळे आणि दीपा शिंदे असे आहे. दरम्यान, या दोघांनी डिसेंबर, 2017 पासून दिवा येथील नागरिकांना साडेबारा टक्के व्याजाचे प्रलोभन दाखवून त्यांची तब्बल 9 लाख 58 हजार 900 रुपयांची फसवणूक केली आहे. या संदर्भात दिवा पूर्व येथील रहिवाशी माया सावळे यांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 

हेही वाचा - बनावट कागदपत्रांच्या मदतीने नोकरीत बढती

मुंबई प्रभादेवी येथील अतुल्य मायक्रो फायनान्स कंपनीत मासिक आवर्ती ठेव योजनेत गुंतवणूक केल्यास वर्षाअखेरीस साडेबारा टक्के दराने व्याजासह रक्कम परत मिळेल, असे प्रलोभन शिंदे व कांबळे या दुकलीने सावळे यांच्यासह दिवा येथील नागरिकांना दिले होते. त्यानुसार अनेकांनी डिसेंबर 2017 पासून गुंतवणूक केली होती. सुरुवातीला वेळेवर रक्कम भरणा केलेल्या पावत्या हे दोघेजण आणून देत असत. मात्र काही काळाने त्यांनी या पावत्या देणे बंद केले.

वर्ष पूर्ण झाल्यानंतर व्याजासह रक्कम मागितली असता दोघेही टाळाटाळ करू लागले. या दुकलीने सुरुवातीचे दोनच हप्ते सदरच्या कंपनीत भरणा करून उर्वरित 10 हप्ते स्वतःच खर्च केले. अशाप्रकारे तब्बल 9 लाख 58 हजार 900 रुपयांचा अपहार त्यांनी केला. सध्या मुंब्रा पोलिस घटनेचा पुढील तपास करत आहेत. 

web title : Diva people cheated by Bunty-Babli


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diva people cheated by Bunty-Babli