
मुंबईत रोज दहा हजार जणांच्या कोरोना चाचण्या करण्याची क्षमता असूनही रोज जेमतेम साडेतीन हजारच चाचण्या होत आहेत. सव्वा कोटींच्या या शहरात आतापर्यंत जेमतेम चार लाखच चाचण्या झाल्या आहेत.
मुंबई : महापालिका आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नामुळे धारावीसह मुंबई शहरातील कोरोनाची साथ आटोक्यात येत आहे, असे विधान महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी नुकतेच केले होते. मात्र असले पोकळ दावे करण्यापूर्वी मुंबईत रोज दहा हजार लोकांच्या कोरोना चाचण्या कराव्यात व महिन्यानंतर परिस्थितीचा आढावा घ्यावा. कारपेटखाली कचरा दडवून ठेवलात तर तो कधीतरी बाहेर येणारच. त्यापेक्षा खोली स्वच्छ करा, अशा शब्दांत अंधेरी (प.) भाजप आमदार अमित साटम यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना सुनावले आहे.
व्हिडिओ: दिल्ली-मुंबई प्रवास अवघ्या १३ तासात, गडकरींनी शेअर केली ब्लू-प्रिंट
शहरातील कोरोनाची साथ नियंत्रणात येण्याच्या स्थितीत असल्याचे विधान चहल यांनी नुकतेच केले होते. त्याचा समाचार घेताना साटम यांनी आयुक्तांना पत्र लिहून सत्यस्थिती दाखवून दिली आहे. अद्यापही शहरातील कोरोनाचा मृत्युदर 5.67 असा देशात सर्वोच्च आहे. मुंबईतील कोरोना बळींची संख्या आता साडेपाच हजारांच्या जवळ आली आहे. मुंबईची लोकसंख्या देशाच्या केवळ एक टक्का आहे, पण मुंबईतील कोरोना बळींची संख्या मात्र देशातील कोरोना मृत्यूंच्या 23 टक्के आहे, असे त्यांनी या पत्रात दाखवून दिले आहे.
मुंबईत रोज दहा हजार जणांच्या कोरोना चाचण्या करण्याची क्षमता असूनही रोज जेमतेम साडेतीन हजारच चाचण्या होत आहेत. सव्वा कोटींच्या या शहरात आतापर्यंत जेमतेम चार लाखच चाचण्या झाल्या आहेत. कमी चाचण्या झाल्याने कोरोना झालेल्यांची खरी संख्या उशिरा कळते व रुग्ण शेवटच्या टप्प्यात उशिरा रुग्णालयात आल्याने मृत्युदर वाढतो. त्यापेक्षा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्याप्रमाणे रोज दहा हजार चाचण्या कराव्यात. त्यामुळे रुग्णांची माहिती लवकर कळून त्यांच्यावर लगेच उपचार झाल्याने आपला मृत्युदर कमी होईल. महिनाभर रोज दहा हजार चाचण्या करून नंतर ऑगस्टच्या मध्यात स्थितीचा आढावा घ्यावा, असेही साटम यांनी म्हटले आहे.
धारावीचं कौतुक आहेच, परंतु दादरमधील अनियंत्रित रुग्णवाढ जास्त चिंताजनक
साथ आटोक्यात येत असल्याबाबत अशी बेजबाबदार विधाने केल्यामुळे फारतर जनता व प्रशासन आत्मसंतुष्ट राहील. काम टाळणारे कर्मचारी जसे कारपेटखाली कचरा लपवतात, तसे करू नये. तो कचरा कधीतरी बाहेर येईलच, म्हणजेच चाचण्या न केल्याने केव्हातरी मुंबईतील रुग्णसंख्या अचानक उफाळून येईल. त्याऐवजी नीट खोली स्वच्छ करा, असाही टोला साटम यांनी लगावला आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे