डोंबिवली : शेअर रिक्षात प्रवासी चार, भाडे मात्र दुप्पट दरानेच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

डोंबिवली : शेअर रिक्षात प्रवासी चार,भाडे मात्र दुप्पट दरानेच

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कोरनिर्बंध शिथिल झाल्यानंतर रिक्षातून तीन प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. रिक्षाचालकांनी पूर्वीप्रमाणेच चार प्रवासी बसविण्यास सुरुवात केली असून शेअर भाडे मात्र दुप्पट दरानेच आकारले जात आहे. शेअर रिक्षाच्या भाडेवाढीला प्रवाशांचा विरोध होत असला तरी, रिक्षाचालक मात्र वाढीव दरावर ठाम आहेत. या भाडेवाढीवर आरटीओ ने लवकर तोडगा न काढल्यास प्रवाशांच्या सहनशीलतेचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोना काळात सुरक्षिततेचा उपाय म्हणून रिक्षातून केवळ दोन प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी होती. कोरोनाचे नियम आता शिथिल झाले असून रिक्षाचालकांनी रिक्षात तीन ते चार प्रवासी बसविण्यास सुरुवात केली आहे. कोरोना काळात रिक्षात कमी प्रवासी असल्याने चालक प्रवाशांकडून पूर्ण भाडे आकारत होते. स्वतःची सुरक्षितता आणि नियमांचे उल्लंघन नको म्हणून प्रवाशांनी देखील त्यास कधी विरोध केला नाही. मात्र कोरोनाचे नियम शिथिल झाल्यानंतर प्रवासी संख्या वाढविल्यानंतर पूर्वीप्रमाणे रिक्षाचालकांनी शेअर रिक्षाचे भाडे आकारणे अपेक्षित असताना रिक्षाचालक मात्र प्रत्येक प्रवाशाकडून पूर्ण भाडे आकारत आहे. यामुळे अनेकदा चालक आणि प्रवासी यांच्यात खटके उडाल्याचे पहायला मिळाले आहे. आता तर रिक्षातून चार ते पाच प्रवासी बसवू लागल्यानंतर मात्र प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत होत आहे. पूर्वी जिथे 10 ते 15 रुपये शेअर भाडे होते तिथे आता 20 ते 30 रुपये आकारले जात आहेत. एका फेरीत रिक्षाचालकाला 60 ते 120 रुपये मिळत आहेत.

हेही वाचा: 'न्यायालयाला धमकी देऊन न्याय मिळत नाही,संप मागे घ्या' - परब

चार प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई केली जात असल्याचे उप प्रादेशिक परिवहन विभागाकडून बोलले जात असले तरी कल्याण डोंबिवलीतील 75 टक्के रिक्षा स्थानकातून चार प्रवासी वाहतूक होत आहे. स्टेशन परिसरात ठराविक ठिकाणी कारवाई करून केवळ कारवाईचा दिखावा प्रशासनाकडून केला जात आहे.

रिक्षाचालकांच्या या जादा भाडे वसुलीला प्रवासी कंटाळले आहेत. डोंबिवलीतील प्रवासी मित्र संघटनेने चार प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा थांब्याचा सर्व्हे केला आहे. आणि याची सविस्तर माहिती प्रादेशिक परिवहन विभागास दिली आहे. यासोबतच त्यांनी जादा भाडे आकारणी करणाऱ्या रिक्षाचालकांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी एक टोल फ्री क्रमांक, व्हॉटअप नंबर द्यावा. शेअर रिक्षाचे अधिकृत दर प्रसिद्ध करावेत. किंवा मीटर प्रमाणे दर लागू करावे अशी मागणी उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे केली असल्याचे पाम संघटनेचे सचिन गवळी यांनी सांगितले.

हेही वाचा: परिवहन मंत्री परब यांची एसटी मुख्यालयातील बैठक निष्फळ

रिक्षाचालकांविरोधातील तक्रारीचे निरसन करण्यासाठी स्वतंत्र सहाय्यक प्रादेशिक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. शेअर रिक्षाभाडे संदर्भात सर्व्हे झाला असून दरपत्रक तात्पुरत्या स्वरूपात प्रसिद्ध करणार आहोत. त्यावर आठवड्याभरात हरकती, सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर पालिका प्रशासनाच्या वतीने अधिकृत दरपत्रक प्रसिद्ध करण्यात येईल. रिक्षाचालकांची तक्रानोंदविण्यासाठी चार ते पाच दिवसांत एक व्हाट्स अप नंबर जाहीर केला जाईल.

- तानाजी चव्हाण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी

loading image
go to top