डोंबिवलीतील अनेक भागात 51 तास पाणी नाही...

नागरिकांनी व्यक्त केला संताप ; दुरुस्तीच्या कामासाठी एमआयडीसीच्या वतीने शुक्रवार ते शनिवार 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद
Dombivali no water supply for 51 hours behalf of MIDC for repair work mumbai
Dombivali no water supply for 51 hours behalf of MIDC for repair work mumbai sakal

डोंबिवली - देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी एमआयडीसीच्या वतीने शुक्रवार ते शनिवार 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. चोवीस चे 51 तास होऊनही एमआयडीसी निवासी विभाग, नांदिवली, भोपर, 27 गावांचा परिसर अशा अनेक भागात रविवारी देखील पाणी न आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सर्वसामान्य चाकरमान्यांच्या खिशाला परवडत असल्याने अनेकांनी डोंबिवली एमआयडीसी निवासी भाग, नांदिवली, देसलेपाडा परिसरात घर घेतले आहे. परंतु डोंबिवलीत रहायला आलो की नरकात अशी संतप्त प्रतिक्रीया नागरिकांनी व्यक्त केली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात शटडाऊन नाही मात्र देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली तसेच विविध कारणांमुळे या भागात पाणीच येत नसल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. संतप्त नागरिक सोमवारी एमआयडीसी कार्यालयाला भेट देऊन अधिकाऱ्यांना याचा जाब विचारण्याच्या तयारीत आहेत.

एमआयडीसीच्या बारवी गुरुत्व वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी शुक्रवारी दुपारी 12 ते शनिवार दुपारी 12 असा 24 तासासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. यामुळे कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, एमआयडीसी, ग्रामीण भागातील पाणी पुरवठा खंडीत होता. शनिवारी दुपारनंतर अनेक भागात पाणी आले, परंतू डोंबिवली एमआयडीसी निवासी भाग, 27 गावं, देसलेपाडा, नांदिवली, भोपर आदि भागात पाणी आले नाही. पाईपलाईन मधून पाण्याची गळती सुरु असल्याने दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आल्याचे उत्तर एमआयडीसी अधिकाऱ्यांकडून नागरिकांना देण्यात आले. हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी रविवार दुपारचे 3 वाजले, सुमारे 51 तास पाणी या भागात नसल्याने नागरिक कमालीचे संतापले आहेत. अनेक नागरिकांनी एमआयडीसी पाईपलाईनच्या ज्या ठिकाणाहून पाण्याची गळती सुरु आहे, त्या ठिकाणी मोठ मोठे प्लास्टिकचे कॅन नेऊन पाणी भरल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत होते.

यावर्षी धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने लघू पाटबंधारे विभागाकडून, एमआयडीसीकडून पाण्याचा शटडाऊन करण्यात आला नाही. मात्र 15 दिवसापासून एकदा देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार पाणी पुरवठा खंडीत केला जातो. त्यानंतर अतिशय कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु केला जात असल्याने पुढील दोन ते तीन दिवस पाण्याचा तुटवडा नागरिकांना सहन करावा लागतो.

पाण्यासाठी नागरिकांना टॅंकरचा आधार उरला आहे, टॅंकरच्या प्रतिक्षेत रांगा लावायच्या, टॅंकर माफियांची मुजोरी सहन करायची, 3 ते 5 हजार रुपये मोजून 10 हजार लिटरचा टॅंकर नागरिकांनी विकत घ्यायचा, कधी कधी तो देखील मिळत नाही असेच दिवस या भागातील नागरिक ढकलत आहेत. बिस्लरी बाटला 30 रुपये पण आता त्याला 60 ते 80 रुपये भाव आला आहे. घरात लहान मुलांना या पाण्यामुळे सर्दी, खोकला होता. दुसरीकडे राहायला जायचे तर घर घेणे परवडणारे आहे का? असे अनेक प्रश्न येथील नागरिकांना भेडसावत आहे. गरीबांना तर विकतचे पाणीही परवडत नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होतात. तीन दिवस पाणी न आल्याने पाईपलाईनवरील व्हॉल्व्हचे नट बोल्ट सैल करुन त्यातून अनधिकृतपणे पाणी चोरुन नागरिकांनी त्याचा वापर केल्याचे चित्र या दोन दिवसांत पहायला मिळाल्याचे नगारिक सांगतात.

एमआयडीसीने देखभाल दुरुस्तीसाठी 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवला होता. शनिवारी दुपारी 12 नंतर पाणी पुरवठा सुरु होताच पाईपलाईन गळती सूरु झाल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी पुढील 25 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला. गुरुवार नंतर नागरिकांना थेट रविवारी दुपारी तीन वाजता पाणी मिळाले मात्र तेही अतिशय कमी दाबाने. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. वारंवार अशा प्रकारे एमआयडीसीकडून शटडाऊनच्या फसवणाऱ्या नियोजनामुळे नागरिकांना वेठीस धरले जात असल्याने त्रस्त नागरिकांनी सोमवार 30 मे रोजी एमआयडीसी कार्यालयात धडक देत जाब विचारण्याचा निर्धार केल्याची माहिती डोंबिवली एमआयडीसी वेल्फेअर असोसीएशनचे राजू नलावडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com