डोंगरीत ७ मजली इमारतीचा भाग कोसळला, बचावकार्य सुरु

पूजा विचारे
Wednesday, 2 September 2020

मुंबईच्या डोंगरी भागात ७ मजली इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे.  आज सकाळी ही दुर्घटना घडल्याचं समजतंय.

मुंबईः मुंबईच्या डोंगरी भागात ७ मजली इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे.  आज सकाळी ही दुर्घटना घडल्याचं समजतंय. तिसऱ्या मजल्यापासून सातव्या मजल्यापर्यंत मागील संपूर्ण भाग कोसळला आहे. घटनेची माहिती समजताच पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावर बचाव कार्य सुरु असल्याची माहिती समजतेय. दरम्यान इमारतीच्या जिन्याजवळ एक महिला अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. 

सकाळी ७.३० ला  सरदार वल्लभ भाई पटेल मार्गा लगत असलेली पेट्रोल पंपा शेजारील रज्जाक मेंशन ही इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ६ लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून जखमींना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

हेही वाचाः काळजी घ्या! मुंबईत मलेरियाचा कहर, वाढत्या रुग्णांसह दोघांचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची पाच वाहनं आणि रुग्णवाहिका तातडीनं घटनास्थळी दाखल झाली. तसंच बचावकार्यही तातडीनं सुरु करण्यात आलं. त्यामुळे अनेकांचे जीव वाचले.

अधिक वाचाः येत्या दोन दिवसात अंतिम परीक्षाबाबत निर्णय येणार, उदय सामंत यांची माहिती

मंगळवारी रात्री १२ ते १२.३० दरम्यान इमारत कोसळण्याच्या स्थितीत आल्यानं ती रिकामी करण्यात आल्याचं, स्थानिक आमदार अमीन पटेल यांनी सांगितलं. दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, नगरसेवक ज्ञानराज निकम, पालिका सी आणि बी वार्ड सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले घटनास्थळी उपस्थित होते. इमारतीतील आठ कुटुंबियांचे स्थलांतर म्हाडा ट्रांजिट कैम्प येथे करण्यात येईल असे आमदार अमीन पटेल म्हणाले.
 

Dongri area Part of building collapses  woman trapped


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dongri area Part of building collapses woman trapped