हापूसप्रेमींनो..! एप्रिल महिन्यापर्यंत करावी लागणार प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 February 2020

नवी मुंबई : मार्च महिना सुरू होण्याची वेळ आली आहे. मात्र, अजूनही बाजारात कोणत्याही भागातून आंब्यांची हवी तशी आवक सुरू झालेली नाही. वातावरणातील बदलाचा फटका बसल्याने आंब्याला हवी तशी फळधारणा झालेली नाही. परिणामी, बाजारात आंबे येण्यासाठी अजून दीड महिन्याचा अवधी लागणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे रसदार आंब्यांसाठी नागरिकांना एप्रिल महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

ही बातमी वाचली का? झालं असं काही..! पाचशे कोटींची विक्रमी कमाई

या वर्षी मुळातच आंब्याला उशिरा मोहर धरला. त्यातच पडलेल्या थंडीने मोहर काही प्रमाणात गळून पडला. जो मोहर तग धरून राहिला, तोही आताच्या उकाड्यामुळे गळत आहे. परिणामी, आंब्याच्या झाडांना हवी तशी फळधारणा झालेली नाही. झाडांवर अगदी तुरळक आंबे दिसत आहेत. सध्या कोकणातून बाजारात हापूस आंब्यांची केवळ 100 ते 125 पेट्यांची आवक होत आहे. दरवर्षी या हंगामात 500 ते 1000 पेट्यांपर्यंत आवक होते. पुरवठ्याच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने बाजारात येणाऱ्या आंब्याला सध्या अधिक भाव मिळत आहे. पिकलेल्या हापूसची पाच डझनाची पेटी आठ ते 12 हजार रुपयांपर्यंत विकली जात आहे. कच्चा हापूसही 1500 ते 2500 रुपये डझनाने विकला जात आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर मानला जात आहे. या महागड्या आंब्याला सर्वसामान्यांकडून मागणी नाही. मात्र, व्यावसायिक आणि उच्चभ्रू वर्गाकडून त्याला मागणी आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. 

ही बातमी वाचली का? बेलापूर खाडीकिनारील आगीतून संशयाचा धूर
 
केवळ पाच टक्के आवक 
सध्या हापूससोबतच वाशी बाजारात बेंगनपल्ली, बदामी यासह विविध प्रकारचे आंबे दाखल होत आहेत. मात्र, हे आंबेही हव्या त्या प्रमाणात येत नसल्याने, आवक खूपच कमी होत आहे. सध्या बाजारात नेहमीच्या तुलनेत केवळ पाच टक्के आंबे येत आहेत. त्यामुळे हापूसचा दर गगनाला भिडला आहे. 

सध्या देवगड हापूस थोड्याफार प्रमाणात बाजारात येत आहे. रत्नागिरीमध्ये अनेक ठिकाणी झाडाला अजूनही हवी तशी फळधारणा झालेली नाही. जी फळे धरली आहेत, तो आंबा तयार होऊन बाजारात येण्यासाठी एप्रिलचा महिना उजाडणार आहे. त्यानंतरच म्हणजे एप्रिलनंतर आंब्याची आवक वाढण्याची शक्‍यता आहे. तेव्हाच हापूस आंब्याचा हंगाम सुरू होईल. 
- विजय बेंडे, व्यापारी. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to climate change the season of Hapus is prolonged