"खेळ मांडियेला'वरून महाविकास आघाडीत नाराजी?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

पालिका निवडणुकीत कंबर कसून उतरलेल्या महाविकास आघाडीच्या प्रसिद्धीची सूत्रे पुन्हा एकदा लाडके आदेश बांदेकर यांच्या "खेळ मांडियेला' या कार्यक्रमावर सोपवण्यात आली आहे. मात्र, या कार्यक्रमाचे नियोजन आणि खर्च विश्‍वासात न घेता करत असल्यामुळे शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तिन्ही पक्षांत मनमुटाव असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजले आहे.

नवी मुंबई : पालिका निवडणुकीत कंबर कसून उतरलेल्या महाविकास आघाडीच्या प्रसिद्धीची सूत्रे पुन्हा एकदा लाडके आदेश बांदेकर यांच्या "खेळ मांडियेला' या कार्यक्रमावर सोपवण्यात आली आहे. मात्र, या कार्यक्रमाचे नियोजन आणि खर्च विश्‍वासात न घेता करत असल्यामुळे शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तिन्ही पक्षांत मनमुटाव असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजले आहे. या कार्यक्रमावरून एकमत होत नसल्यामुळे ऐरोली-दिघा विभागात या कार्यक्रमाला स्पष्ट नकार देण्यात आला आहे. भाऊजींच्या कार्यक्रमावरील खर्चाबाबत चर्चा करण्यासाठी मविआच्या नेत्यांनी शनिवारी (ता.22) एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाल्याचे समजते.

ही बातमी वाचली का? कॉलेजमधल्या निवडणुकांबाबत शरद पवार म्हणाले...

पालिका निवडणुकीत आमदार गणेश नाईक यांच्या अभेद्य किल्ल्यावर चढाई करण्यासाठी मविआतर्फे जोरदार मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. नाईकांचे मनसबदार फोडल्यानंतर आता शहरात मविआची वातावरणनिर्मिती करण्याची धुरा शिवसेनेने उचलली आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने भाऊजींच्या लोकप्रियतेचा आधार घेतला होता. त्याची फलश्रुती म्हणून शिवसेनेला 38 जागा मिळाल्या होत्या; परंतु आता तर शिवसेनेसोबत कॉंग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही बलाढ्य पक्ष सोबत असल्यामुळे मविआला पालिका काबीज करता येणार आहे. त्याकरिता काही दिवसांपासून मविआतर्फे शहरात विविध नोडमध्ये "खेळ मांडियेला' या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून वाद्यवृंद, महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून, बक्षिसे व पैठणी वाटप केली जात आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तब्बल 8 ते 10 लाख रुपये खर्च येत असून, हा खर्च शिवसेनेतर्फे कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडून वसूल केला जात आहे. शिवसेनेकडून या कार्यक्रमाच्या खर्चातील भागिदारीत येणारा खर्च वसूल करण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना बिले पाठवली जात असल्याचे समजते. प्रत्येकाच्या वाट्याला 2 ते 3 लाख रुपयांचा खर्च येत आहे. मात्र, एवढा खर्च करून हातात उमेदवारीचे तिकीट मिळेल की नाही? याची शाश्‍वती नसल्यामुळे या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत शिवसेनेसोबत मित्रपक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी पाहता ऐरोली विधानसभा मतदारसंघात एका आयोजनानंतर ऐरोली, दिघा परिसरातील कार्यक्रम रद्द केल्याचे समजते. 

ही बातमी वाचली का? गणेश नाईकांना धक्का! त्या चार नगसेवकांनी बांधलं शिवबंधन...

आगामी कार्यक्रम 
बेलापूर मतदारसंघात चार ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत. 26 फेब्रुवारीला जुईनगर, 1 मार्चला नेरूळमधील तेरणा मैदान, 3 मार्चला सानपाड्यातील गावदेवी मैदान, 4 मार्चला वाशी सेक्‍टर- 9 मध्ये कार्यक्रम होणार आहेत. 

मविआतील मित्रपक्षांमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. याउलट आम्ही सर्व कार्यक्रमांचे आयोजन एकमेकांना विश्‍वासात घेऊन करीत आहोत. मविआबाबत दिशाभूल करण्यासाठी अशा वावड्या उठत आहेत. 
- अनिल कौशिक, जिल्हाध्यक्ष, नवी मुंबई 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to khel mandiyela Annoyed in mahavikas aaghadi?