लॉकडाऊनमुळे दुकान बंद असून वीज कंपन्यांनी धाडली बिले, व्यापारी नाराज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मे 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लाॅकडाऊन दरम्यान शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून मुख्य बाजारपेठेतील सर्वच दुकाने बंद आहेत

ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लाॅकडाऊन दरम्यान शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून मुख्य बाजारपेठेतील सर्वच दुकाने बंद आहेत. त्यानंतरही महावितरणाने सर्वच दुकानांच्या वर्षभराच्या वीज वापराची सरासरी काढून एप्रिलची वीज देयके दुकानदारांना पाठवली आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी असून वीजेच्या वापरानुसार देयके वसूल करण्यात यावी, अशी मागणी व्यापारी संघटनांनी महावितरणाकडे केली आहे.

हे ही वाचा : 'का' वाढतोय कोरोना रुग्णांचा आकडा? मुंबई पालिकेनं घेतला शोध... 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मार्चपासून सरकारतर्फे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, यासाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सुमारे दीड महिन्यांपासून ठाण्याच्या बाजारपेठांमधील इतर सर्व दुकाने बंद आहेत. दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांसमोर आर्थिच पेच निर्माण झाला आहे. त्यात दुकानांमध्ये काम करणाऱया मजुरांनाही पगार द्यावा लागणार आहे. संचारबंदीदरम्यान मीटर रिडींग घेणे शक्य नसल्याने महावितरणने वर्षभराच्या वीज वापरानुसार सरासरी एप्रिलची वीज आकारणी सुरु केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दुकाने बंद असताना देखील व्यापाऱ्यांना सरासरी देयक आकारणीनुसार ५ हजार ते ५० हजारापर्यंत वीज देयके आली आहेत.

नक्की वाचा : कोरोनावरील लस 'फास्टट्रॅक'मध्ये बनवा ! कोरोना लस निर्मितीत भारताची मजल कुठवर?

आधीच व्यावसाय बंद असल्याने आर्थिक नुकसान होत असताना या वीज बिलांमुळे व्यापाऱयांपुढे आर्थिक पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे ही वीज देयके मागे घेऊन वीज वापरानुसार देयके आकारावीत, अशी मागणी ठाणे सुभाष पथ व्यापारी वेल्फेअर असोसिएशनने महावितरणाकडे केली आहे. तसेच टाळेबंदीमुळे व्यापार ठप्प असल्याने ही वीज देयके भरताना उशीर झाल्यास दंड आकारू नये, अशीही मागणी करण्यात आली आहे.

मोठी बातमी : लवकरच येऊ शकते गोड बातमी ! १०० युनिटपर्यंत वीज मोफत? मंत्री नितीन राऊत यांचं मोठं वक्तव्य..

नवीन वीज देयकांमधून मागील देयकाचे समायोजन
संचारबंदीमुळे महावितरण प्रशासनाने ग्राहकांचे मीटर रिडींग घेणे बंद केले आहे. त्यामुळे ग्राहकांनी वापर केलेल्या वीजेनुसार देयक मिळवण्यासाठी त्यांच्या मीटरच्या रिडींगची संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून देयक मिळवावे, असे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे, मात्र, रिडींग नोंदणी केली नसलेल्या ग्राहकांना सरासरीनुसार देयके पाठवण्यात येत आहेत, तरी पुढील कालावधीत प्रत्यक्ष मीटर रिडींग घेतल्यानंतर ग्राहकांकडून अचूक वीज देयके आकारण्यात येणार आहेत. तसेच नवीन वीज देयकांमधून मागील देयकाचे समायोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरण विभागाने दिली आहे.

Due to the lockdown, the shop is closed and the electricity companies gives the bills


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the lockdown, the shop is closed and the electricity companies gives the bills