येस बँकप्रकरणी राणा कपूर आणि कुटुंबियांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 May 2020

येस बँकेचे  संस्थापक राणा कपूर व त्यांच्या कुटुंबियांविरोधात सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) बुधवारी पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. 5050 कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारात आतापर्यंत 168 खाती ईडीच्या रडावर आली असून त्यांच्यावर टाच आणण्यात आली आहे.

मुंबई  : येस बँकेचे  संस्थापक राणा कपूर व त्यांच्या कुटुंबियांविरोधात सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) बुधवारी पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. 5050 कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारात आतापर्यंत 168 खाती ईडीच्या रडावर आली असून त्यांच्यावर टाच आणण्यात आली आहे. हे याप्रकरणातील पहिले आरोपपत्र आहे.कपूर यांनी 2010 मध्ये प्रियांका गांधी-वाड्रा यांच्याकडून खरेदी केलेल्या चित्राचा  उल्लेखही आरोपपत्रात आहे.

मोठी बातमी ः कोरोनाचा धोका कायम! मुंबईतील आणखी एक कोळीवाडा सील

राणा कपूर  यांच्यासह त्यांची पत्नी बिंदू, मुली राधा, राखी, रोशनी तसेच त्यांच्याशी संबंधित मॉर्गन क्रेडिट्स, आरएबी इंटरप्रायझेस,  येस कॅपिटल प्रा. लि यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.  येस बँकेतील गैरव्यवहार समोर आल्यानंतर ईडीने बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर आणि संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली होती. या कारवाईनंतर राणा कपूर यांना  अटक करण्यात आली होती.  याप्रकरणी दाखल कपूर व त्यांच्या कुटुंबियांवर बुधवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यात दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडशी (डीएचएफएल) संबधित असलेल्या नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनीकडून (एनबीएफसी) कपूर कुटुंबाशी सबंधित असलेल्या डूइट अर्बन व्हेंचर प्राईव्हेट लिमिटेड कर्ज देण्यात आले होते. या कंपनीत कूपर यांच्या मुली रोशनी, राधा व राखी यांचे समभाग आहेत.  

मोठी बातमी ः बैठकीत निर्णय झाला नसतानाही एसटी बँकेकडून मदतनिधी जाहीर

त्याचवेळी डीएचएफएलकडे येस बँकेचे 3 हजार 700 कोटींच कर्ज होते. राणा कपूर येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ असताना या आर्थिक घडामोडी घडल्या त्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. हे कर्ज देताना गहाण ठेवण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत 40 कोटींपेक्षाही कमी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. ते प्रत्यक्षात साडे सातशे कोटी रुपये किंमतीची असल्याचे दाखवण्यात आले होते. याप्रकरणी राणा व त्यांच्या पत्नीचे व्यवहार पाहणा-या एका महिलेचीही ईडीने चौकशी केली होती. त्यामुळे याप्रकरणी कपूर यांच्याशी संबंधीत 104 कंपनी आता ईडीच्या रडावर आहेत. त्याप्रकरणी ईडी अधिक तपास करत आहे.

मोठी बातमी ः बोंबला ! मुंबईच्या जी टी हॉस्पिटलमधून कोरोनाग्रस्त रुग्ण पळाला, वाचा नक्की काय झालंय.. 

याशिवाय हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि.(एचडीआयएल) याच्याशी संबंधीत 202 कोटी रुपयांच्या कर्जा संबंधीही ईडी तपास करत आहे. त्यात दोन वर्षांपूर्वी जून्या कंपनीच्या दुरुस्तीसाठी ही रक्कम देण्यात आल्याचे दाखवण्यात आले होते.  येस बॅंकेकडुन देशातील 11 मोठ्या उद्योग समुहाने जवळपास 42 हजार 136 कोटींचे कर्ज घेतले होते. हे सर्व कर्ज बुडीत खात्यात गेल्याने, ईडीने यातील प्रत्योकावर वक्रदृष्टी ठेवली आहे. त्यातील अनेकांना चौकशीसाठी समन्सही पाठवण्यात आले होते. पण त्यानंतर कोरोनाचे संकट आल्यामुळे ही सर्व प्रक्रिया थांबली आहे.

हे वाचा ः ...हे बेईमानीचेच लक्षण, शिवसेनेनं डागलं योगी सरकारवर टीकास्त्र

याप्रकरणी कपूर व त्यांच्याशी संबंती 168 बँक खात्यांवर ईडीने टाच आणली आहे. याशिवाय तीन कोटी रुपयांच्या किंमतीचे म्युच्युअल फंड, चार कोटी किंमतींची 59 चित्र आहेत. राणा कपूर यांच्याकडील माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची चित्र प्रसिद्ध चित्रकार एमएफ हुसेन यांनी काढलेले आहे. कपूर यांनी 2010 मध्ये ही चित्र प्रियांका गांधी-वाड्रा यांच्याकडून खरेदी केल्याचे बोलले जात आहे.त्यासाठी 2 कोटी रुपये बँक खात्यातून देण्यात आल्याचा  उल्लेखही आरोपपत्रात आहे. याबाबत ईडीकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ED filed chargesheet against rana kapoor family