शालेय शिक्षणमंत्र्यांची कोरोनावर मात, काळजी घेण्याचं केलं आवाहन

तेजस वाघमारे
Tuesday, 29 September 2020

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी  त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

मुंबई: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी  त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जनतेचे प्रेम आणि सर्वांच्या शुभेच्छांबरोबरच या काळात योग्य आहार, योग, प्राणायाम, ध्यानधारणा आणि वाचन यामुळे लवकर बरे होण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मराठवाडा मुक्ती दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने गायकवाड या 15 ते 17 सप्टेंबर या कालावधीत नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर होत्या. या दरम्यान त्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्या होत्या. 21 सप्टेंबरला त्यांना ताप आल्यामुळे कोरोना टेस्ट करुन घेतली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर सोमवारी म्हणजेच 28 सप्टेंबरला त्यांना घरी सोडण्यात आले. 

अधिक वाचाः  गुगलचं नवीन भन्नाट फिचर; आता गुगलवर जाणून घ्या कोरोना हॉटस्पॉटची माहिती

कोरोनानिदान झाल्यानंतर योग्य ते उपचार घ्यावेत, सकारात्मक भावना ठेऊन ध्यान धारणा करावी. तसेच आपल्यामुळे इतरांना प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी,  असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.

अधिक वाचाः  म्हाडा विजेत्यांसाठी खुशखबर, घराचा ताबा मिळण्याचा मार्ग झाला मोकळा

ठाकरे सरकारमधील आतापर्यंत जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अस्लम शेख, बाळासाहेब पाटील, सुनील केदार, अब्दुल सत्तार आणि विश्वजित कदम यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व नेते बरे झाले आहेत. 

तर काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. याबाबत खुद्द एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती. जलसंपदा आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचीही कोरोनाची पॉझिटिव्ह चाचणी आली होती. 

----------

(संपादनः पूजा विचारे) 

Education Minister Varsha Gaikwad defeats Corona


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Education Minister Varsha Gaikwad defeats Corona